गाेदाम फुल्ल, धान खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:14 AM2021-02-21T04:14:34+5:302021-02-21T04:14:34+5:30
कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाच्या माध्यमातून रामटेक तालुक्यात पाच ...
कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाच्या माध्यमातून रामटेक तालुक्यात पाच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांवर शेतकऱ्यांकडीत धानाची आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यात आली. शिवाय, ५० क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल ७०० रुपयाचा बाेनसही जाहीर केला. सध्या या केंद्रांवरील गाेदाम फुल्ल झाले असून, तिथे धानाची पाेती ठेवायला जागा शिल्लक नाही. दुसरीकडे, या काळात आदिवासी विकास महामंडळाने गाेदामांमधील धानाची उचल करणे अपेक्षित असताना, ती केली नाही. त्यामुळे रामटेक तालुक्यातील पाचही केंद्रांवरील धान खरेदी १५ दिवसापूर्वीच बंद करण्यात आल्याने धान उत्पादकांच्या विवंचनेत वाढ झाली आहे. याला आदिवासी विकास महामंडळाचा अनागाेंदी कारभार जबाबदार असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.
रामटेक तालुक्यातील भंडारबोडी, पवनी व घोटी या तीन आदिवासी विकास महामंडळाने तर बांद्रा व टुयापार येथे पणन महासंघाने स्थानिक संस्थांच्या मदतीने धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. या पाचही केंद्रावर शेतकऱ्यांकडील धानाची आधारभूत किमतीनुसार १५ दिवसापूर्वीपर्यंत खरेदी सुरू हाेती. ही सर्व खरेदी केंद्र वेळेवर सुरू करण्यात न आल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला हाेता.
दरम्यान, पवनी येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यातच भंडारबाेडी येथील खरेदी केंद्र इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांचा राेष व आदिवासी विकास महामंडळाच्या अडचणी वाढल्या. बांद्रा व टुयापार येथील खरेदी केंद्राबाबतही असंताेष निर्माण झाला हाेता. या समस्यांना लाेकमतने वेळावेळी वृत्त प्रकाशित करून वाचा फाेडली हाेती. त्यामुळे घाेटी येथील खरेदी केंद्र हिवराबाजार येथे सुरू करण्यात आले. तालुक्यातील शासकीय धान खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
...
अर्ध्यापेक्षा कमी खरेदी
या पाचही खरेदी केंद्रांनी त्यांच्या मर्जीने त्यांचे भाैगाेलिक अधिकार क्षेत्र वाटून घेतले. आठवडाभराच्या धान खरेदीनंतर हिवराबाजार येथील केंद्राचे गाेदाम फुल्ल झाले. या केंद्रावरील धान खरेदी बंद करण्यात आल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आले. हिवराबाजार येथील खरेदी केंद्र मुद्दाम बंद करण्यात आल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, एकूण उत्पादनाच्या अर्ध्यापेक्षा अधिक धान अजूनही विक्रीविना शेतकऱ्यांकडे पडून आहे.
...
माेजमापात दिरंगाई
या प्रत्येक खरेदी केंद्रावर दिवसाकाठी चार ते पाच शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी अनास्था आणि दिरंगाईमुळे धानाचे माेजमाप करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. त्यातच आता गाेदाम फुल्लची समस्या मानगुटीवर बसली. विशेष म्हणजे शासकीय धान खरेदीचा काळ १ डिसेंबर ते ३१ मार्च हा आहे. राजकीय श्रेय लाटण्यासाठी यावर्षी घाईघाईत खरेदी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. शिवाय, दीड महिन्यापूर्वीच खरेदी बंद करण्यात आली.
...
मिलिंग सुरू झाल्यावर या गाेदामांमधील धानाची उचल केली जाईल. त्यानंतर पुन्हा खरेदी सुरू हाेईल. साेमवारपासून मिलिंग सुरू हाेण्याची शक्यता आहे. राईस मिलर व धानाची उचल करणाऱ्यांसाेबत करार करण्यात आला आहे. मनुष्यबळ आणि गाेदामांची कमतरता असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
- अविनाश राठाेड, प्रादेशिक व्यवस्थापक,
आदिवासी विकास महामंडळ, भंडारा.