नागपूर मेट्रो स्टेशन्सवर उमटली गडचिरोलीच्या रानावनातली पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 02:32 PM2019-11-07T14:32:51+5:302019-11-07T14:35:09+5:30

भामरागड तालुक्यातल्या कोडपे व तिरकामेटा या दोन अति दुर्गम गावातील हे ३५ आदिवासी स्त्री पुरुष प्रथमच बाहेरचे जग अनुभवायला निघाले होते.

Gadchiroli people visits Nagpur metro stations | नागपूर मेट्रो स्टेशन्सवर उमटली गडचिरोलीच्या रानावनातली पावले

नागपूर मेट्रो स्टेशन्सवर उमटली गडचिरोलीच्या रानावनातली पावले

Next
ठळक मुद्देकाय पाहू आणि काय नको असे झालेकाहींनी प्रथमच रेल्वे पाहिली

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सकाळी साडेदहा-अकराची वेळ. वर्धा रोडवरच्या साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरच्या निशब्द वातावरणात माडिया भाषेत गडबड सुरू झाली. पण गटप्रमुखाने दिलेल्या आदेशाचे पालन करत शिस्तीत सगळेजण चालू लागले. एरव्ही शहरात मॉल वा सिनेमा हॉलमध्ये कुणी प्रथमच एस्कलेटरवर पाय ठेवणारं असेल तर त्यांची घाबरगुंडी व गोंधळ ठरलेलाच. पण वाघा-अस्वलाशी टक्कर घेणारा हा माडिया आदिवासी मुळीच गडबडला नाही. त्या सरकत्या जिन्यावर उभं राहण्याचं टेक्निक काही क्षणातच शिकून त्यावर चढता झाला. पुढ्यात आलेल्या मेट्रोच्या वातानुकूलित डब्यात शिरून स्थानापन्न होऊन मग एखाद्या लहान मुलाच्या निरागसतेने त्या डब्याचे निरीक्षण करू लागला. निमित्त होते, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाने आयोजित केलेल्या नागपूर भेटीचे. दरवर्षी भामरागड तालुक्यातल्या लहान लहान खेड्या-पाड्यांवरच्या आदिवासी स्त्रीपुरुषांना, मुलांना बाहेरचे जग दाखवण्याच्या उपक्रमाचे. भामरागड तालुक्यातल्या कोडपे व तिरकामेटा या दोन अति दुर्गम गावातील हे ३५ आदिवासी स्त्री पुरुष प्रथमच बाहेरचे जग अनुभवायला निघाले होते.
तीन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी प्रथम सोमनाथला भेट दिली होती. नंतर आनंदवन पाहिले आणि गुरुवारी ते नागपुरात दाखल झाले होते.
मेट्रो राईड केल्यानंतर त्यांचा दीक्षाभूमीला जाण्याचा प्लॅन होता. ते आटोपल्यावर मध्यवर्ती संग्रहालय, झिरो माईल, रेल्वेस्टेशन, बसस्टँड, नारायण स्वामी मंदिर असे नागपूर दर्शन घेऊन ते परतीच्या प्रवासाला लागणार होते. यात ७-८ वर्षाच्या शाळकरी मुलापासून ते साठी गाठलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. चार स्त्रियाही होत्या.
दूरदूरपर्यंत दिसणाºया उंच इमारती, मधल्या भागात असलेली वनराई आणि मध्येच दिसणारं एखादं नवलाईचं दृश्यं. हे सगळं निरखत या बांधवांची मेट्रो राईड सीताबर्डी स्थानकावर पोहचली. डब्यामधून बाहेर पडताना गोंधळ, धक्काबुक्की नाही.. कर्कश्श शिट्ट्या नाहीत आणि हो, तंबाखूच्या पिचकाºयाही नाहीत. सगळं शांततेत आणि शिस्तीत. सीताबर्डी स्थानकावर काही काळ व्यतीत करून पुन्हा परतीच्या गाडीने साऊथ एअरपोर्ट स्टेशन गाठले. यातल्या एखाद दुसºयाने रेल्वे पाहिली होती. पण बाकीच्यांसाठी रेल्वे ही विमानाहून कमी नव्हती. दरम्यान विमानतळ परिसरातून जाताना, उडणारे विमानही त्यांना पाहता आले. नागपूर मेट्रोच्या राईडने सुखावलेले, आनंदलेले हे बांधव मग दीक्षाभूमीकडे रवाना झाले.

Web Title: Gadchiroli people visits Nagpur metro stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो