आदिवासींसाठी गडकरींनी चालविली ‘स्पेशल ट्रेन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:24 PM2019-02-18T23:24:20+5:302019-02-18T23:26:31+5:30
गरीबांचा कुणी वाली नसतो व त्यांच्या अडचणीत सहसा लवकर कुणी धावून येत नाही, असे साधारणत: म्हटले जाते. मात्र कचारगड यात्रेला जाण्यासाठी पहाटेपासून रेल्वे स्थानकात ताटकळत पडलेल्या शेकडो आदिवासी बांधवांना सोमवारी राजकीय व्यक्तिमत्त्वातील मायेचा ओलावा अनुभवायला मिळाला. वंचितांसाठी सामाजिक जाण जपलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सह्रद्यता दाखवत या आदिवासींना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला व रात्री उशीरा त्यांच्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरीबांचा कुणी वाली नसतो व त्यांच्या अडचणीत सहसा लवकर कुणी धावून येत नाही, असे साधारणत: म्हटले जाते. मात्र कचारगड यात्रेला जाण्यासाठी पहाटेपासून रेल्वे स्थानकात ताटकळत पडलेल्या शेकडो आदिवासी बांधवांना सोमवारी राजकीय व्यक्तिमत्त्वातील मायेचा ओलावा अनुभवायला मिळाला. वंचितांसाठी सामाजिक जाण जपलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सह्रद्यता दाखवत या आदिवासींना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला व रात्री उशीरा त्यांच्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथे दर वर्षी गोंडी धर्म दीक्षा व बडा देव महाशक्तीची पूजा होते. यात हजारोंच्या संख्येत गोंड आदिवासी सहभागी होतात. यंदा १७ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत हे आयोजन करण्यात आले असून यात्रेसाठी कचारगडकडे जाण्यासाठी सोमवारी पहाटे हजारहून अधिक नागरिक मुख्य रेल्वे स्थानकावर एकत्र आले. दरवर्षी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासन त्यांना नि:शुल्क प्रवासाची सुविधा देते. मात्र सोमवारी गरीब नागरिकांना रेल्वे प्रशासनाने धक्काच दिला. त्यांना मुख्य रेल्वेस्थानकातून रेल्वेने जाऊ देण्यात आले नाही व इतवारी रेल्वेस्थानकात जाण्यास सांगण्यात आले. हे आदिवासी पायी चालून इतवारी रेल्वेस्थानकात पोहोचले. मात्र येथेदेखील त्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी योग्य व्यवहार करण्याची तसदीदेखील दाखविली नाही. यामुळे आदिवासी नाराज झाले होते. अनेक जण तर दिवसभर तहानभुकेने व्याकूळ होऊन रेल्वेस्थानकातच बसून होते.
नितीन गडकरी यांना रात्री नऊ वाजता याची माहिती कळताच त्यांनी त्वरित दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय व मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि गोंड आदिवासी बांधवांसाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले व रेल्वे प्रशासनाने त्वरित पावले उचलत विशेष ‘पॅसेंजर’ गाडी चालविली. कॉंग्रेसचे कार्यकते अॅड.अक्षय समर्थ यांनीदेखील आदिवासी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न केले.
रेल्वे प्रशासनाला सूचना : बंदोपाध्याय
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय व मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता नितीन गडकरी यांचा फोन आल्याचे त्यांनी सांगितले. चाचेर येथे इंजिन रुळांवरुन घसरल्यामुळे ‘डाऊन लाईन’ प्रभावित झाली होती. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होताच आदिवासी प्रवाशांसाठी इतवारी रेल्वेस्थानकातून कचारगडसाठी विशेष ‘पॅसेंजर’ गाडी चालविण्याची सूचना देण्यात आली, अशी माहिती बंदोपाध्याय यांनी दिली.