मेणातून साकारले गडकरी
By admin | Published: May 28, 2017 02:26 AM2017-05-28T02:26:02+5:302017-05-28T02:26:02+5:30
नितीन गडकरी यांच्या लाईफस्टाईलचा अभ्यास करून मेणाचा पुतळा तयार केल्याची माहिती लोणावळा येथील सुनील’स सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम प्रा.लि.चे कलाकार सुनील कंडल्लूर
सुनील कंडल्लूर यांनी तयार केला पुतळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नितीन गडकरी यांच्या लाईफस्टाईलचा अभ्यास करून मेणाचा पुतळा तयार केल्याची माहिती लोणावळा येथील सुनील’स सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम प्रा.लि.चे कलाकार सुनील कंडल्लूर यांनी लोकमतशी बोलताना दिली. गडकरी यांच्या मेण्याच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या निवासस्थानी खुद्द गडकरी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
गडकरी यांचा पुतळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास लोणावळा येथून नागपुरात आणला. तो आता वॅक्स म्युझियम येथे ठेवण्यात येणार आहे. पुतळा तयार करण्यापूर्वी गडकरी यांचे माप घेऊन त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. हुबेहुब पुतळा तयार करण्यासाठी तब्बल एक महिना लागला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रचिती देते, असे ते म्हणाले.
म्युझियममध्ये महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, समाजसेवक अण्णा हजारे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी, क्रिकेटपटू कपिल देव, मोनालिसा, अमिताभ बच्चन, अमित शाह, सोनिया गांधी आदींसह अन्यचे मेणाचे पुतळे आहेत. सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर (परशा), अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांच्या पुतळ्याचे महिन्यापूर्वीच अनावरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लोणावळा येथील सुनील’स सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम प्रा.लि.चे कलाकार सुनील कंडल्लूर यांनी तयार केलेल्या मेण्याच्या पुतळ्याचे अनावरण करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी.