गडकरी ‘ॲक्शन मोड’मध्ये, नऊ दिवसांत राज्यात ५० सभा
By योगेश पांडे | Published: November 6, 2024 10:39 PM2024-11-06T22:39:15+5:302024-11-06T22:39:34+5:30
- योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे राज्याच्या निवडणूक प्रचारात सक्रियपणे उतरणार असून ...
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे राज्याच्या निवडणूक प्रचारात सक्रियपणे उतरणार असून नऊ दिवसांतच त्यांच्या ५० सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ७ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत या सभा होतील. याशिवाय १६, १७ व १८ नोव्हेंबर रोजीदेखील त्यांच्या सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभेच्या प्रचाराच्या रिंगणात महायुतीच्या प्रचारासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची फौजच उतरविण्यात आली आहे. एकेकाळी राज्याचे विधीमंडळ गाजविणारे गडकरी हे राज्याच्या सर्वच भागात फिरून प्रचारसभांना संबोधित करतील. प्रदेश भाजप कार्यालयाने त्यांच्या सभांचे नियोजन केले आहे.
त्यांच्यासोबत भाजप व महायुतीचे ज्येष्ठ नेतेदेखील असतील. प्रचारातील अखेरच्या तीन दिवसांतील सभा व रोड शो लक्षात घेता गडकरींच्या सभांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाचे कार्य व राज्य शासनाची अडीच वर्षांतील कामगिरी या आधारावर गडकरी त्यांच्या रोखठोक शैलीत मतदारांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती प्रदेश भाजपकडून देण्यात आली.