गडकरी बोलतात, ते करतात

By admin | Published: May 28, 2017 02:00 AM2017-05-28T02:00:51+5:302017-05-28T02:00:51+5:30

आमचे नेते नितीन गडकरी यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. त्यांच्या निवडक कामांबाबत भाष्य करणे म्हणजे किशोर कुमार यांच्या सुमधूर गाण्यांतून ....

Gadkari speaks, they do | गडकरी बोलतात, ते करतात

गडकरी बोलतात, ते करतात

Next

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गडकरी यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमचे नेते नितीन गडकरी यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. त्यांच्या निवडक कामांबाबत भाष्य करणे म्हणजे किशोर कुमार यांच्या सुमधूर गाण्यांतून काही गाणे निवडण्यासारखेच मोठे कठीण आव्हान आहे. प्रचंड आत्मविश्वास ही नितीन गडकरी यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. ते मोठमोठी स्वप्ने पाहतात व त्यांना पूर्ण करून दाखवितात. मी एखादे काम करण्याअगोदर अभ्यास करतो व मग बोलतो. नितीनजी मात्र जे बोलतात ते करूनच दाखवितात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नितीन गडकरी यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा शनिवारी कस्तूरचंद पार्क येथे पार पडला. नितीन गडकरी व पत्नी कांचनताई गडकरी यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह, सन्मानपत्र व एक कोटी एक लाख रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांसह, मंत्री, राज्यमंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गडकरी यांचा प्रवास संघर्षशील राहिला आहे. मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. कठीण परिस्थितीतदेखील ते धीर सोडत नाहीत. २००२ मध्ये त्यांचा मोठा अपघात झाला होता. पाय ‘प्लॅस्टर’मध्ये असतानादेखील त्यांनी तशा अवस्थेत नागपुरात सभा घेतल्या व भाजपाला मनपात यश मिळाले. आज ते देशातील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री आहेत. त्यांचा रस्ते व विकासाबाबतचा अभ्यास पाहता अनेकांना तर त्यांचे अभियांत्रिकीचेच शिक्षण झाल्याचे वाटते. तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग नेहमीच त्यांना आकर्षित करतात. शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान नेण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे व त्यांच्या माध्यमातून विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना तंत्रज्ञान कळत आहे. ते आपल्या कार्यकर्त्यांशी आजदेखील तितक्याच आत्मियतेने वागतात. यामुळेच ते लोकप्रिय आहेत. देशभरात ते विकास कार्य करीत असून नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र त्यांच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर आहे. ते सर्वार्थाने लोकनेते आहेत, शा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडकरी यांच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव केला.

देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता
‘कॅबिनेट’च्या बैठकीत बोलणारे मंत्री फारच कमी असतात. गडकरी मात्र योग्य मुद्यासाठी कुणालाही न घाबरता आपले मत मांडतात. लोकसभा निवडणुकानंतर गडकरी यांना याहून अधिक मोठे पद मिळेल, अशी अपेक्षा होती. संतविचाराने चालणारे व देशाच्या प्रगतीचाच विचार करणारे गडकरी यांचे भविष्य उज्ज्वल आहे. देशाचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नितीन गडकरी यांचा गौरव केला.
शिंदे म्हणाले, नितीन गडकरी हे व्यक्तिमत्त्वच दिलखुलास आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळेच सर्व पक्षांत त्यांचे मित्र आहेत. त्यांचा स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची हातोटी यामुळे ते सर्वांना भावतात. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेकदा माझी राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. देशात काम करीत असले तरी मतदारसंघासाठी वाटेल ते करण्यासाठी ते तयार असतात. अगदी नागपूरच्या विकासाच्या मुद्यावर चक्क काँग्रेस नेत्यांना सोबत घेत विधिमंडळात आंदोलन केले, अशी आठवणही त्यांनी सांगितली. भाजपाचे अध्यक्ष असताना त्यांनी कधी प्रौढी मिरविली नाही. सामान्य कार्यकर्त्यांना ते कधीच विसरले नाही. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचे काम खरोखर मनाला समाधान देणारे आहे. त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती साधी नाही, मात्र ते सक्षमपणे ती पार पाडत आहेत, असेही शिंदे म्हणाले.

‘मॅन आॅफ आयडियाज्’
नितीन गडकरी यांचा प्रवास पाहत आलोय व त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे अनुभवांची शिदोरी गोळा करणेच असते. मौलिक चिंतक, राष्ट्रवादी विचारक, कुशल संघटक, यशस्वी प्रशासक ही गडकरी यांची ओळख आहे. त्यांच्यात अद्भूत नेतृत्वक्षमता असून ते जे काम हाती घेतात त्यात त्यांना यश मिळतेच. नवनवीन कल्पनांचे तर त्यांच्याकडे भांडारच आहे. खऱ्या अर्थाने ते ‘मॅन आॅफ आयडियाज्’ आहेत, असे गौरवोद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काढले. गडकरी यांच्या मनात कधी कुणाबाबत वाईट नसते. विरोधकांशी तात्त्विक मतभेद असले तरी मनभेद नसतो. अहंकार त्यांना अद्यापपर्यंत शिवलेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आपल्या कृतीतून दुसऱ्यांना प्रेरणा देतात. मध्य प्रदेशात त्यांच्या सल्ल्यामुळेच कृषी विकास दर वाढला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनातून आम्ही शहरांच्या विकासासाठी प्रयत्न केले व देशातील पहिल्या १०० स्वच्छ शहरात मध्य प्रदेशातील २२ शहरे आहेत. आम्ही त्यांना २००० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांची मागणी केली, त्यांनी ६००० किलोमीटरच्या महामार्गाला मान्यता दिली. गडकरी हे ज्ञान, भक्ती व कर्म यांचा त्रिवेणी संगमच आहेत, असेदेखील चौहान म्हणाले.

रविशंकर, लतादीदींचे शुभेच्छासंदेश

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे काही कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी ‘व्हिडीओ’च्या माध्यमातून शुभेच्छासंदेश पाठविला. आध्यात्मिक मान्यतेनुसार वयाच्या साठीनंतर आयुष्याचे एक नवे चक्र सुरू होते. गडकरी या नवीन टप्प्यात अधिक जोमाने काम करतील व विकासाचा वेग आणखी वाढवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गानकोकिळा लता मंगेशकर यांचा लिखित संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. सत्कार समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मानपत्राचे प्रा. प्रमोद शर्मा यांनी वाचन केले.

 

Web Title: Gadkari speaks, they do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.