नागपुरात गडकरीच राखणार ‘गड’; ‘एक्झिट पोल’चा कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:51 AM2019-05-20T09:51:10+5:302019-05-20T09:51:54+5:30
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘बिगफाईट’मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बाजी मारतील, असा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘बिगफाईट’मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बाजी मारतील, असा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे. गडकरी परत विजयी होतील व कॉंग्रेसचे नाना पटोले यांना पराभवाचा सामना करावा लागेल. तसेच रामटेकमध्येदेखील शिवसेनेचे कृपाल तुमाने हे कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांना पराभूत करतील, असा कौल विविध ‘पोल’मधून समोर आला आहे. या ‘एक्झिट पोल’मुळे भाजपा-सेनेच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर ‘एक्झिट पोल’ जाहीर होण्यास सुुरुवात झाली. बहुतांश ‘पोल’नुसार देशात रालोआची सत्ता परत येईल, असा कौल देण्यात आला आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध कॉंग्रेसचे नाना पटोले असा सामना आहे. नितीन गडकरी हे मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे तर पटोले हे गडकरींना धक्का देतील, असे दावे कॉंग्रेसकडून करण्यात आले. ‘न्यूज १८-आयपीएसओएस’च्या समोर आलेल्या ‘एक्झिट पोल’नुसार विदर्भात पहिल्या टप्प्यात झालेल्या सातही जागांवर भाजपा-सेना युतीचेच उमेदवार निवडून येतील.
नितीन गडकरी हे नागपुरातून विजयी होतील तुमाने रामटेकची जागा राखतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र टुडेने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणेदेखील गडकरी व तुमाने हेच नागपूर व रामटेकमधून विजयी होतील. याशिवाय विविध वृत्तवाहिन्या व संस्थांच्या ‘पोल’च्या आकडेवारीनुसार गडकरी व तुमाने यांच्याच विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘युवा भारती-एसपीए’चा गडकरींनाच कौल
युवा भारती नागपूर व ‘एसपीए’तर्फे केवळ नागपूरच्या जागेबाबत ‘एक्झिट पोल’ जाहीर करण्यात आला. या ‘आॅनलाईन पोल’नुसार नागपुरात गडकरीच विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गडकरींना ६७.४ टक्के तर पटोले यांना २७.४ टक्के मत मिळतील. बसपाचे मोहम्मद जमाल यांना ३ टक्के व वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांना १.४ टक्के मत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कुणबी, तेली, ब्राह्मण, हलबा-कोष्टी,आदिवासी, माळी, सुतार, सोनार, मराठा, माहेश्वरी, जैन समाजाची अर्ध्याहून अधिक मतं गडकरी यांना मिळतील, असे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
काय म्हणतात ‘एक्झिट पोल’चे अंदाज
एक्झिट पोल नागपूर रामटेक
न्यूज १८-आयपीएसओएस नितीन गडकरी (भाजपा) कृपाल तुमाने (शिवसेना)
युवा भारती-एसपीए नितीन गडकरी (भाजपा) कृपाल तुमाने (शिवसेना)
महाराष्ट्र टुडे नितीन गडकरी (भाजपा) कृपाल तुमाने (शिवसेना)