फडणवीसांचे गडकरींना अनोखे ‘गिफ्ट’
By admin | Published: May 28, 2016 02:50 AM2016-05-28T02:50:40+5:302016-05-28T02:50:40+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिर सप्ताहाने एक इतिहास घडविला.
महाआरोग्य शिबिर : मतभेदांपलीकडचे भावनिक बंध
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिर सप्ताहाने एक इतिहास घडविला. सात दिवस चाललेल्या या शिबिरात जवळपास २५ हजार रुग्णांना लाभ झाला. या शिबिरामुळे आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जसे बळ मिळाले तसेच राजकीय कार्यकर्त्यांनाही विधायक कार्याची एक दिशा गवसली. वास्तविक या महाआरोग्य शिबिराची मूळ कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. फडणवीस आणि गडकरी यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. या मतभेदाच्या खऱ्या आणि खोट्या बातम्या माध्यमात सतेत चर्चेत असतात. तर कार्यकर्त्यांच्या उमेदवारी नियुक्त्यांचे निमित्त साधून हे मतभेद विकोपाला कसे गेले आहेत, हेही चवीने सांगितले जाते. परंतु या दोघांमधील स्नेहाचे नाते या राजकीय मतभेदापलीकडचे आहे. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते समोर आले. दोन महिन्यांपूर्वी नागपूर भेटीत फडणवीस यांनी यावेळी नितीन गडकरी यांना वाढदिवसाची अनोखी ‘गिफ्ट’ देऊ, अशी भावना व्यक्त केली होती अन् त्यातूनच या महाआरोग्य शिबिराची कल्पना पुढे आली. भाजपाचे महामंत्री नगरसेवक संदीप जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. आज शिबिराचा समारोप झाला. त्यावेळी उपस्थित अनेक रुग्णांनी व्यक्त केलेल्या सद्गदित भावना या शिबिराची यशस्वीता सांगणाऱ्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी वाढदिवसानिमित्त गडकरींना दिलेल्या या भावनिक ‘गिफ्ट’ने कार्यकर्त्यांनाही अपेक्षित असा संदेश गेलाच.(प्रतिनिधी)