फडणवीसांच्या घरी गडकरींची स्वारी, मनपा निवडणुकीच्या रणनीतीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 11:31 AM2021-10-17T11:31:32+5:302021-10-17T11:36:58+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी शनिवारी महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पक्षाच्या नगरसेवकांविषयी कार्यकर्ते व नागरिकांत नाराजी आहे. यामुळे भाजप नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. शनिवारी रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही पोहोचले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. नवी रणनीती आखून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत गडकरी, फडणवीस यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, मनपातील प्रमुख पदाधिकारी, कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
गेल्या साडेचार वर्षांत नगरसेवकांनी प्रभागातील समस्या सोडविल्या नाहीत. कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. अनेक प्रभागात पदाधिकारी व नगरसेवकांतील वाद विकोपाला गेला आहे. तरुण पिढीवर विकास कामांचा फारसा प्रभाव नाही. नागपूर मनपात गेल्या तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे. मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना उत्तरे द्यावी लागतील. यासाठी नवीन रणनीती आखण्यावर मंथन झाले.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने त्यांना प्रशासनाची मदत मिळण्याची शक्यता आहे. जाहीर कार्यक्रमातून कुठल्या समाजावर टीका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला बैठकीत देण्यात आला. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी काय रणनीती आखावी, यावर कोअर कमिटीच्या सदस्यांनी मते मांडली.
काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचार काढणार
मनपातील १५ वर्षे भाजपची सत्ता व मागील काळातील काँग्रेसची सत्ता या दोघांपैकी कुणाच्या काळात शहरात विकासकामे झाली यांचा प्रचार केला जावा. काँग्रेस काळात मनपा भ्रष्टाचाराची प्रकरणे घडली. अशा प्रकरणांची माहिती लोकांपुढे मांडावी. भाजपची सत्ता चांगली होती. असे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यावर चर्चा झाली.
जिल्हा परिषद निवडणुकीचा धसका
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला जबर फटका बसला. विशेष म्हणजे शहरालगतच्या भागातील जागा गमवाव्या लागल्या. पक्षाच्या पराभूत उमेदवारात नाराजी आहे. याचा परिणाम शहरालगतच्या मनपाच्या जागावर होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने रणनीती ठरवावी लागेल असे मत काही सदस्यांनी मांडले.