काेराडी वीज केंद्राच्या विस्तारित प्रकल्पाच्या सुनावणीत गाेंधळ; काॅंग्रेस-भाजप आमनेसामने
By निशांत वानखेडे | Published: May 29, 2023 07:18 PM2023-05-29T19:18:12+5:302023-05-29T19:18:42+5:30
Nagpur News काेराडी औष्णिक वीज केंद्रात प्रस्तावित ६६० मेगावॅट क्षमतेच्या दाेन नवीन प्रकल्पाच्या संभाव्य प्रदूषणाच्या समस्येवर साेमवारी झालेली जनसुनावणीत गाेंधळ उडाला.
नागपूर : काेराडी औष्णिक वीज केंद्रात प्रस्तावित ६६० मेगावॅट क्षमतेच्या दाेन नवीन प्रकल्पाच्या संभाव्य प्रदूषणाच्या समस्येवर साेमवारी झालेली जनसुनावणीत गाेंधळ उडाला. नव्या प्रकल्पाचे समर्थन करणारे लाेक (भाजपा कार्यकर्ते) आणि काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये बाचाबाची आणि एकदुसऱ्याविराेधात नारेबाजी झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. पाेलिसांना मध्यस्थी करून गाेंधळ शांत करावा लागला. प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांद्वारे विराेध करणाऱ्यांच्या बाेलतेवेळी ‘हुटिंग’ केली जात असल्याने अनेकदा भांडणाची परिस्थिती निर्माण झाली हाेती.
१३२० मेगावॅटच्या प्रस्तावित दाेन नव्या प्रकल्पांवर सुचना व आक्षेप नाेंदविण्यासाठी काेराडी वीज केंद्राच्या बांधकाम विभागाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेत जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशाेक करे व उपप्रादेशिक अधिकारी यु.बी. बहादुले उपस्थित हाेते. काॅंग्रेसच्या साेशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवारी यांनी बाेलण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रदूषण नियंत्रणाच्या मानकांना डावलून प्रकल्प रेटण्यात येत असल्याचा आराेप केला. नागपूर जिल्ह्यातच प्रकल्प का रेटण्यात येत आहे, असा सवाल करीत गावकऱ्यांचे आराेग्य, प्रकल्पासाठी लागणारे पाणी, काेळसा काेल वाॅशरिजमध्ये धुतला जात असताना वीज स्वस्त कशी हाेणार, असे प्रश्न महाजेनकाेला विचारले. महाजेनकाे काही उद्याेजकांच्या दबावात कार्य करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. काॅंग्रेस शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी वीज केंद्राच्या राखेचा प्रश्न उपस्थित केला. केंद्राची राख कन्हान नदीत साेडली जात असल्याने नागपूरकरांना प्रदूषित पाणी प्यावे लागत असल्याचा आराेप त्यांनी केला. वीज केंद्राच्या प्रदूषणाचा भार विदर्भावरच का, असा आक्षेप त्यांनी घेतला. काॅंग्रेसचे प्रदेश सचिव संदेश सिंगलकर यांनी जनसुनावणी घेण्यावरच आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली.
काॅंग्रेस नेते त्यांचा पक्ष मांडून जात असताना प्रकल्पाच्या समर्थकांनी घाेषणाबाजी सुरू केली. समर्थकांची मतेही ऐकूण घ्यावी, असे म्हणत मुर्दाबाद-जिंदाबादची नारेबाजी सुरू झाली. दाेन्ही पक्ष एकमेकांसमाेर उभे ठाकले. तणावाची परिस्थिती पाहता पाेलिसांनी हस्तक्षेप करून माहाेल शांत केला. यावेळी कांग्रेस महासचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, प्रशांत धवड, प्रमोद सिंह ठाकुर आदी उपस्थित हाेते.
राेजगाराचा मुद्दा प्रदूषणावर भारी
जनसुनावणीदरम्यान नव्या प्रकल्पाच्या समर्थकांची संख्या अधिक हाेती. बहुतेक गावच्या ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी बेराेजगारीचा मुद्दा उपस्थित करीत प्रदूषणापेक्षा तरुणांच्या राेजगाराचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. समर्थकांत शुभम आवरकर, रिपब्लिकन पार्टी (आ.) बाळू घरडे, मदन राजुरकर, रवी पारधी, वारेगावचे सरपंच कमलाकर बांगडे, खैरीच्या सरपंच याेगिता धांडे, गुमठीच्या सरपंच सीमा माेरे यांचा समावेश हाेता. यातील बहुतेकांनी प्रदूषणाची समस्याच नसल्याचे नमूद केले. मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययाेजना करण्यासह परिसरात रुग्णालय, शाळा, ग्रामपंचायतींना विशेष निधी व इतर मूलभुत सुविधा देण्याची मागणी केली. विराेध करणाऱ्यांमध्ये चक्की खापाचे विवेकसिंह सिसाेदिया यांनी मुलांना वीज केंद्राच्या प्रदूषणातून वाचवा असा फलकही झळकाविला. यासह मसाळाचे भैयालाल माकडे, कामठी पंचायत समिती सदस्या दिशा चनकापुरे यांनीही विराेध दर्शविला.