नक्षलवादी संघटनेचे नेतृत्व गगन्नाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:12 PM2018-03-14T23:12:56+5:302018-03-14T23:12:56+5:30
छत्तीसगडमधील सुकमा येथील किस्टाराम परिसरात नक्षलवाद्यांनी मंगळवारी मोठा घातपात घडवून आणला होता. त्यात काही सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते. हा हल्ला म्हणजे नक्षलवाद्यांकडून भविष्यात होणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा इशारा मानण्यात येत आहे.
- फहीम खान
नागपूर - छत्तीसगडमधील सुकमा येथील किस्टाराम परिसरात नक्षलवाद्यांनी मंगळवारी मोठा घातपात घडवून आणला होता. त्यात काही सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते. हा हल्ला म्हणजे नक्षलवाद्यांकडून भविष्यात होणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा इशारा मानण्यात येत आहे. दरम्यान, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी संघटनांचा वर्तमान महासचिव गणपती गुडघेदुखीमुळे त्रस्त असून, त्याची जागा नंबाला केशवराव (गगन्ना) याने संघटनेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. केशवराव याने नक्षलवादी संघटनेची सूत्रे स्वीकारल्याची माहिती मिळाल्यापासून सुरक्षा दलांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गगन्ना याने नक्षली संघटनेची सूत्रे हाती घेतल्याने चिंता वाढण्याचे कारण म्हणजे त्याने संघटनेत मिलिट्री कमिशनचा इन्चार्ज म्हणून काम पाहिलेले आहे. त्याला संघटनेतील सर्वात धोकादायक नेता मानले जाते. तसेच वेगवान आणि धोकादायक कारवायांसाठी तो ओळखला जातो. त्याउलट गणपती हा बऱ्यापैकी शांत स्वभावाचा होता. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणाची चिंता वाढली आहे. गणपती आजारी असल्याने गगन्नाने संघटनेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. मात्र त्याच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याच्या नावावर अंतिम मोहोर ही केंद्रीय कमिटीच्या बैठकीत लागणार आहे.