सामान्य रसिकांची दाद हेच गायधनी यांच्यासाठी मोठे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:22 AM2020-11-26T04:22:35+5:302020-11-26T04:22:35+5:30
नागपूर : यशवंतराव चव्हाणांसारखे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते ज्या महाकवीच्या कवितांचा संदर्भ देऊन भाषणे करायचे, ज्या कविच्या प्रतिभेची दखल जग ...
नागपूर : यशवंतराव चव्हाणांसारखे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते ज्या महाकवीच्या कवितांचा संदर्भ देऊन भाषणे करायचे, ज्या कविच्या प्रतिभेची दखल जग घेत आहे, अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित होत आहेत, त्या सुधाकर गायधनी यांच्या कवितांना सामान्यांचीही तेवढीच दाद मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रभूषण सारख्या पुरस्कारापेक्षा सामान्य रसिकांची दाद हेच त्यांच्यासाठी मोठे प्रमाणपत्र आहे, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांनी काढले.
कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ कवि सुधाकर गायधनी यांचा एक लाख रूपये आणि स्मृतिचिन्ह असा समावेश असलेला स्व. माणिकलाल गांधी स्मृती विदर्भ गौरव पुरस्कार -२०२० देऊन भावे यांच्या हस्ते सपत्निक सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत तिडके होते. ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे प्रमुख पाहुणे होते. प्रतिष्ठानचे गिरीश गांधी व्यासपीठावर उपस्थित होते.
समारंभादरम्यान वक्त्यांनी गायधनी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळावा, अशी भावना व्यक्त केली. तो धागा पकडून भावे म्हणाले, खऱ्या प्रतिभावंताचे सत्कार, पुरस्काराने काही अडत नाही. पाणी थोपवल्याने जसे न थांबता वाट काढते, तसे खऱ्या प्रतिभावंतांचे असते.
सत्काराला उत्तर देताना सुधाकर गायधनी म्हणाले, साहित्य ही संवादकला आहे. ती दुर्बोध असू नये. नेणिवेच्या डोहात जाताना प्रज्ञापकड मजबूत असली तर ती प्रतिभा साकारते, अन्यथा विकृत बनते. आपल्या काव्यावर बुद्ध आणि येशूचा प्रभाव असल्याचे सांगून ते म्हणाले, यामुळेच आपल्या काव्यात करुणा झळकते.
गणेश कनाटे म्हणाले, १९८० नंतर ताकदीच्या कविता निर्माण झाल्या नाही, अलिकडे कवितासंग्रह खपत नाही, ही प्रकाशकांची खंत आहे. कवितेचे हे हरविलेले बळ उभारण्यासाठी कविता आणि समीक्षकांसाठी संस्थात्मक उभारणी केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. श्रीकांत तिडके म्हणाले, गायधनी हे लययोग साधलेले कवी आहेत. त्यांच्या कविता दुर्बोधही नाहीत, सुबोधही नाहीत, मात्र सामान्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या आहेत. प्रारंभी प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन रेखा दंडिगे-घिये यांनी तर आभार बाळ कुलकर्णी यांनी मानले.