गेल ऑम्वेट यांनी पीएच.डी.चा प्रबंधच नागपुरातून पूर्ण केला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:17+5:302021-08-26T04:12:17+5:30
नागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकरी विचारवंत तसेच स्त्री-मुक्तीवादी ...
नागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकरी विचारवंत तसेच स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या ज्येष्ठ संशोधक -लेखिका डाॅ. गेल ऑम्वेट यांचे बुधवारी निधन झाले. फुले-आंबेडकरी विचारांच्या पाईक असल्याने साहजिकच डाॅ. गेल यांचे नागपूरशी जवळचे संबंध हाेते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर ४०-५० वर्षापासूनच्या नागपूरशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा मिळाला.
जन्माने अमेरिकन असलेल्या डाॅ. गेल यांनी अमेरिकन विद्यापीठात ‘वसाहतीक साेसायटीतील सांस्कृतिक बंड- पश्चिम भारतातील ब्राह्मणेतर चळवळ’ या विषयावरील पहिला पीएच.डी.चा प्रबंध सादर केला ताे नागपूरच्या वसंत मून यांच्या ग्रंथालयाचा आधार घेत. त्यानंतर १९७९ साली बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांनी नागपुरात आयाेजित केलेल्या बामसेफच्या पहिल्या अधिवेशनाचे आतिथ्य त्यांनी स्वीकारले. त्यांच्या लेखन साहित्याचा कांशीराम यांच्यावर मोठा प्रभाव हाेता. नागपुरात झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाही त्या राहिल्या आहेत. दीक्षाभूमीवरील अनेक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती राहिली आहे. अमेरिका साेडून भारताशी जुळलेल्या डाॅ. गेल यांच्या निधनाने आंबेडकरी, बहुजन कार्यकर्त्यांवर शाेककळा पसरली असून भावनिक आदरांजली व्यक्त केली जात आहे.
डाॅ. गेल यांनी अमेरिका साेडून भारताला आपले घर बनविले. फुले-आंबेडकरी विचारातून समतेच्या चळवळीशी स्वत:ला जाेडले. हा त्यांचा त्याग न विसरणारा आहे.
- उत्तम शेवडे, सचिव, बसपा
भारत पाटणकरांसाेबत त्यांचे आदर्श सहजीवन अनेकांना प्रेरणादायी आहे. श्रमिक, कष्टकरी, दलित, वंचित समाजांच्या चळवळींचा एक आधार डॉ. गेल आम्वेट यांच्या निधनामुळे कोसळला आहे. डाॅ. गेल यांना विनम्र श्रद्धांजली.
- श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, विदर्भ सांस्कृतिक परिषद.