वजन वाढतंय? रात्रीचे जेवण बदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 08:23 PM2022-05-25T20:23:07+5:302022-05-25T20:23:31+5:30
Nagpur News रात्री कमी प्रमाणात जेवण केल्याने वजन योग्य राहते, रक्तातील साखरेची पातळी योग्य होते, चयापचय किंवा पचनशक्ती वाढते.
नागपूर : प्रत्येक व्यक्तीने खाण्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे. न्याहारी आणि रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर खावे. बऱ्याच जणांना कामानिमित्त रात्री घरी उशिरा यावे लागते. अशा परिस्थितीत त्यांनी रात्रीच्या जेवणाआधी हलके खाल्ले पाहिजे. रात्रीचे जेवण अर्धपोटी केलेलेच बरे. रात्री कमी प्रमाणात जेवण केल्याने वजन योग्य राहते, रक्तातील साखरेची पातळी योग्य होते, चयापचय किंवा पचनशक्ती वाढते.
रात्री जेवण कसे असावे?
- रात्रीचे जेवण हलके-फुलके घ्यावे, जेवणात मसाल्यांचे प्रमाण खूप कमी असावेत. रात्रीच्या वेळी जेवणात नियमितपणे सलाडचा समावेश करावा. सर्व प्रकारच्या भाज्यांपासून तयार करण्यात आलेले सूप घेणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. अधिक तेलाचा वापर करू नये. मसालेदार जेवण रात्रीच्या आहारात घेतल्यास ढेकर येणे, पोटात दाह होणे आणि गॅसेसचा त्रास होतो. रात्रीच्या जेवणात मांसाहारी पदार्थांचा समावेश करू नये. कारण, मांसाहारी पदार्थ पचण्यास खूप जड असतात. रात्रीच्या वेळी मेटाबॉलिक रेट दिवसाच्या तुलनेत मंद असल्याने रात्री कधीही पोटभर जेवण करू नये.
दुपारचे जेवण कसे असावे?
- दुपारच्या जेवणात चौरस आहार; म्हणजे कोशिंबीर, पोळी-भाजी, वरण-भात असे सर्व पदार्थ असावे. अशा पारंपरिक चौरस आहारात सर्व अन्नगटांचा समावेश असतो व आवश्यक ती सर्व पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात मिळतात.
दुपारचे जेवण सुमारे १ ते २ या दुपारच्या वेळी घ्या. वजन संतुलित किंवा वजन कमी करू इच्छित असल्यास आपण चपाती किंवा तांदळाची, ज्वारीची भाकरी तसेच कमी प्रमाणत भात खाऊ शकता.
ब्रेकफास्टला काय खावे?
- आहारचक्रात सकाळच्या नास्त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. सकाळी उठून रिकाम्या पोटी, नास्त्याच्या आधी किंवा चहा पिण्यापूर्वी, एक, दोन ग्लास पाणी नक्की प्या. सकाळी १० ते ११ न्याहारी (ब्रेकफास्ट) करा. नंंतर सुमारे दोन ते तीन तासांनी हलका नास्ता केलाच पाहिजे. फळ, अंडी, दूूध याचा समावेश असावा. तेलकट पदार्थ टाळावे. अन्यथा, दुपारच्या जेवणाची भूक जास्त वाढेल.
खाण्याच्या वेळा काय असाव्यात ?
- दुपारचे जेवण सुमारे १ ते २ या दुपारच्या वेळी घ्या.
- सकाळी १० ते ११ न्याहारी (ब्रेकफास्ट) नंंतर सुमारे दोन ते तीन तासांनी हलका नास्ता केलाच पाहिजे.
- रात्रीचे जेवण शक्य तेवढ्या लवकर केले बरे. शक्यतो रात्री ८ ते ९ च्या आत जेवण करावे.
व्यायामही महत्त्वाचा
- नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. रक्तदान, ब्लड शुगर व रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणास मदत होते. व्यायाम केल्याने माणसाला नवीन ऊर्जा प्राप्त होते. अन्न पचनास मदत होते. व्यायामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केली तर पचनास फायदा होतो.
आहारचक्राचे पालन करा
- निरोगी आयुष्यासाठी पौष्टिक आहार घेणे व आहारचक्राचे पालन करणे आवश्यक आहे. आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण्यापूर्वी आपण काय खाणार यावर नियंत्रण ठेवा व जितके जमेल तितके खा, अतिसेवन टाळा. पचनास जड असलेले अन्न खाऊन झोपल्याने पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. पोट जड वाटणे किंवा मलावरोध असे त्रास या आहारामुळे होतात. शिवाय, असा आहार घेतल्याने झोपही व्यवस्थित पूर्ण होत नाही.
- डॉ. अभिजित देशमुख,
प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ