पेट्रोल पंपावर लुटमार करणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:27+5:302021-06-05T04:06:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेट्रोल पंपावरच्या कर्मचार्याला मारहाण करून रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सोनेगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल पंपावरच्या कर्मचार्याला मारहाण करून रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सोनेगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. अनिल शंकरराव वानखेडे (वय ३०, रा. पावनभूमी सोमलवाडा), अजय जग्गू यादव (वय २०, रा. शिवणगाव) आणि रुपेश अरुण वरणकर (वय २८, रा. पंचदीप नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास वर्धा मार्गावरील उज्ज्वल नगरात असलेल्या पेट्रोल पंपावर आरोपी पेट्रोल भरण्यासाठी गेले. तेथे मोठी रांग असतानाही आरोपी सर्वात समोर जाऊन पेट्रोलची मागणी करू लागले. त्यामुळे दिवाकर नवलकिशोर तिवारी नामक कर्मचाऱ्याने त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. यावरून वाद घालून आरोपीने तिवारींना मारहाण केली. त्यांच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. तिवारींनी आरडाओरड केली असता, आरोपींनी लपवून ठेवलेला चाकू काढून तिवारीच्या हातावर जखम केली आणि मारण्याची धमकी देऊन तेथून पळून गेले. हा घटनाक्रम पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला. तो व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, तिवारी यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपींचा माग काढून, त्यांना सायंकाळी पंचदीप नगरातून दोन ताब्यात घेतले. त्यांची ओळख पटविल्यानंतर तिवारी यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. आरोपींना लुटमारीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चाकू जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
---