प्रतिकूल परिस्थितीतही निखिल व जया झाले ‘सीए’; पहिल्याच प्रयत्नात अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 12:18 PM2022-02-11T12:18:48+5:302022-02-11T12:25:20+5:30
नरेंद्रनगर येथील रहिवासी निखिल गजानन गुल्हाने व भारत नगर, कळमना रोड येथील रहिवासी जया जैन यांनी दाखवून दिले. दोघांनीही पहिल्याच प्रयत्नात ‘सीए’ अंतिम वर्षाची खडतर परीक्षा उत्तीर्ण केली.
नागपूर : जर स्वत:वर विश्वास असेल तर मोठमोठे अडथळेदेखील दूर करून यश संपादन करता येत असल्याचे नरेंद्रनगर येथील रहिवासी निखिल गजानन गुल्हाने व भारत नगर, कळमना रोड येथील रहिवासी जया जैन यांनी दाखवून दिले. दोघांनीही पहिल्याच प्रयत्नात ‘सीए’ अंतिम वर्षाची खडतर परीक्षा उत्तीर्ण केली. गुरुवारी सायंकाळी उशिरा या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
नागपूर विभागातून ‘सीए’ अंतिम वर्षाच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जया हिने दुसरा क्रमांक पटकावला. निखिल आणि जया यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळविले. निकाल जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ने जया व निखिलशी संवाद साधला. जयाने सांगितले की, तिची अंतिम वर्षाची परीक्षा डिसेंबर २०२१ मध्ये होती. त्यापूर्वी डेंग्यू झाला. यातून बरे पडत नाही तोच आणखी एका आजाराने ग्रासले. या आजारातून बरे होण्यासाठी एक महिना लागला. तोपर्यंत परीक्षा अगदी जवळ आली. असे असतानाही जोमाने परीक्षेची तयारी केली. अखेर मेहनतीचे फळ मिळाले. तिने आपल्या या यशाचे श्रेय पालकांना दिले. जयाचे वडील नरेंद्र जैन यांचे मिनी माता नगरजवळ किराणा दुकान आहे.
- सीए होणे अवघड, असे सर्वांनी सांगितले
निखिलचे वडील गजानन गुल्हाने हे कॉटन मार्केटमध्ये हातगाडीवर व्यवसाय करायचे. निखिलने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. भविष्यात ‘सीए’ व्हायचेच त्याने ठरवले होते. परंतुु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. कुटुंबासोबतच नातेवाइकांनीही त्याला ‘सीए’ न करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला निखिलने विचार बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर पश्चाताप होऊ नये म्हणून ‘सीए’ची तयारी सुरू केली. यासाठी मोठी बहीण पुढे आली. आज तो त्याच्या यशाबद्दल आनंदी आहे.
- वरुण ठरला शहरातील ‘टॉपर’
प्राप्त माहितीनुसार, वरुण अग्रवाल याने परीक्षेत नागपूरमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. वरुणने परीक्षेत ५८४ गुण मिळवले. जया जैन दुसऱ्या स्थानी राहिली. जया हिला परीक्षेत ५१३ गुण मिळाले. मयंक मोकाशी तिसरा आला. दिवेश डागा चौथ्या क्रमांकावर राहिला. दिवेशला ४९२ गुण मिळाले. सिमरन जारानी पाचव्या स्थानी राहिली. तिला ४८८ गुण मिळाले. निखिलला ४४५ गुण मिळाले.