गजभियेंनी अखेरपर्यंत दिली झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:16 PM2019-05-24T22:16:39+5:302019-05-24T22:17:36+5:30
कोई हार गया, कोई जीत गया, आखिर ये इलेक्शन भी बित गया..., पण काही उमेदवार पराभव सहज मान्य करीत नाहीत. रामटेक लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी पराभव समोर दिसत असतानाही एकाकी लढा देत अखेरपर्यंत खिंड लढविली आणि प्रक्रियेदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर घेतलेल्या आक्षेपामुळे प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोई हार गया, कोई जीत गया, आखिर ये इलेक्शन भी बित गया..., पण काही उमेदवार पराभव सहज मान्य करीत नाहीत. रामटेक लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी पराभव समोर दिसत असतानाही एकाकी लढा देत अखेरपर्यंत खिंड लढविली आणि प्रक्रियेदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर घेतलेल्या आक्षेपामुळे प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले.
रामटेक लोकसभेची निवडणूक सुरुवातीपासूनच चांगलीच चर्चेत राहिली. पक्षाने ऐनवेळी किशोर गजभिये यांची उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रामटेकमधूनच नितीन राऊत यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला. पण एबी फॉर्म नसल्याने ते अर्ज दाखल करू शकले नाहीत. पुढे प्रचारादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत किशोर गजभियेंना साथ दिल्याचे म्हणतात. पण मतमोजणीदरम्यान असे काही चित्र दिसून आले नाही. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार सुनील के दार, नाना गावंडे, मुजीब पठाण या काँग्रेसच्या नेत्यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही मतमोजणीला फारसे गांभीर्याने घेतले नाही.
मतमोजणी सुरू झाल्यापासून गजभिये यांनी स्वत: संपूर्ण मतदार संघाची धुरा सांभाळली. काही बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते पोलिंग एजंट म्हणून दिसले. पण गजभियेंच्या पराभवाच्या छटा उमटायला लागल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आणि एक एक करता कार्यकर्त्यांनी आपल्या घरचा रस्ता पकडला. मात्र गजभियेंनी संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत मतमोजणी स्थळावर ठिय्या कायम ठेवला. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान त्यांना आढळलेल्या त्रुटींवर ते सातत्याने आक्षेप घेत होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या आक्षेपांची संख्या ५० वर पोहचली होती.
त्यांच्या आक्षेपाचे समाधान करता करता प्रशासनही चांगलेच जेरीस आले होते. तरीही प्रशासनाने त्यांच्या आक्षेपांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. तुमानेंची लीड एक लाखावर पोहचल्यानंतरही गजभिये आपल्या आक्षेपांवर ठाम होते. जोपर्यंत समाधान होणार नाही, तोपर्यंत मी हरलो नाही, असे ते म्हणत होते. सुरुवातीपासूनच एकाकी झुंज दिलेल्या गजभियेंना रामटेकच्या मतदारांनी चांगले सहकार्य केले. गेल्या निवडणुकीत मुकुल वासनिक यांना मिळालेल्या मतांपेक्षा गजभिये यांनी सव्वा लाख मते अधिक घेतले. या निवडणुकीत गजभिये यांचा पराभव झाला असला तरी, त्यांनी दिलेली वैयक्तिक झुंज वाखाणण्याजोगी होती.