गजभिये म्हणतात मी ही काँग्रेसकडून अर्ज भरणार, कारण...
By आनंद डेकाटे | Published: March 24, 2024 08:33 PM2024-03-24T20:33:31+5:302024-03-24T20:33:50+5:30
रश्मी बर्वेचा अर्ज तांत्रिक बाबींमुळे बाद झाला तर...
नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने जि.प.च्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी सुद्धा रामटेकममधून पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
किशोर गजभिये हे २०१९ च्या निवडणुकीत रामटेकमध्ये काँग्रेसकडून लढले होते. तेव्हा त्यांनी ४,७०,३४३ मते घेतली होती. यावेळीही आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु रश्मी बर्वे या काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरल्या. त्यामुळे किशोर गजभिये हे नाराज असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात लोकमतने त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मी नाराज नाही, मात्र माझ्यावर अन्याय झाला अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मी रामटेकमधून अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवावी असेही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. मी केवळ कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नाराजी नाही, मात्र मी २७ तारखेला काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली असता आपण अर्ज कसा भरणार? अशी विचारणा केली असता ते म्हणाले, पक्षाचा डमी उमेदवारही असतो. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज काही तांत्रिक कारणास्तव रद्द झाला तर मला एबी फार्म मिळू शकतो, त्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरून ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.