आरोग्य समितीत गाजला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:10+5:302021-04-02T04:08:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत कोरोनाचा मुद्दा गाजला. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सुरळीत नसल्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत कोरोनाचा मुद्दा गाजला. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सुरळीत नसल्याच्या कारणावरून आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. यातच समितीला खोटी माहिती देण्याचा प्रकार समोर आल्याने अध्यक्षांनी चांगलाच संतप्त व्यक्त केला.
जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत आरोग्य समितीची बैठक पार पडली. ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्णाबाबत यात चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोनाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी दिली. यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयाबाबतही त्यांनी माहिती दिली. कळमेश्वरमधील रुग्णालय बंद असतानाही ८० खाटांचे कोरोना रुग्णालय कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती खोटी असल्याचे लक्षात येताच, त्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे फोन उचलत नसल्याच्या मुद्यावरूनही त्यांना चांगलेच खडेबोल सुनावण्यात आले. बैठकीत त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर दिल्याने अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सेलोकर यांना आपल्या कक्षात बोलावून घेतले. कळमेश्वरमधील रुग्णालयात तत्काळ कंत्राटी डॉक्टरची नियुक्ती करण्याचे निर्देश दिल्याचे बर्वे यांनी सांगितले.