उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 08:25 PM2018-08-30T20:25:39+5:302018-08-30T20:43:42+5:30
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील ४५३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा येथे स्मार्ट सिटी योजनेच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट या घटकांतर्गत कामे सुरू असून यावर ११० कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने घोडदौड सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील ४५३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा येथे स्मार्ट सिटी योजनेच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट या घटकांतर्गत कामे सुरू असून यावर ११० कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने घोडदौड सुरू आहे.
सध्या टाऊन प्लानिंगनुसार डीपीआर तयार करण्यात येत असून डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या परिसराच्या विकासासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मार्च २०१८ पासून प्रत्यक्षांत कामांना प्रारंभ होणार आहे. याशिवाय या परिसरात वायफाय हबच्या कामाला सुरुवात होणार आहे.
रँकिंगमध्ये पहिला क्रमांक
केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने नुकतीच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले आहे. यात आपल्या नागपूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामांच्या प्रगतीच्या आधारावर हे रँकिंग करण्यात आले आहे.
लवकरच सुरू होणारे प्रकल्प
५२ किलोमीटरचे रस्ते, इंटिग्रेटेड रोड, पाणीपुरवठा, सिवरेज, पावसाळी नाल्या, पारडी, भरतवाडा, पुनापूर व भांडेवाडी भागाचा विकास, चांगल्या दर्जाची परिवहन सेवा, रस्ते विकास, उड्डाण पूल, स्मार्ट बस शेल्टर, शेअर बाईक, ई-रिक्षा, आॅटोमोटेड एमएलसीपी पारडी, होम स्वीट होम, स्मार्ट सिटी क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र, सार्वजनिक उद्यान, लॅन्ड स्केपिंग, कचरामुक्त शहर, स्मार्ट ट्रॅश बीन, ग्रीन लाईट प्रकल्प, नागनदी सौदर्यीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सुरक्षा अॅप, कम्युनिटी क्लिनिक, ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टिम, पदपथ विकसित करणे, दहनघाट आदींचा समावेश आहे.
निवासी संकुलाचा आराखडा
अहमदाबादच्या एचपीसी डिझाईन, प्लानिंग अॅन्ड मॅनेजमेंट प्रा.लिमिटेडतर्फे निवासी संकुलाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेत ३० मीटर, २४ मीटर, १८ व ९ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. तसेच उद्यान, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, व्यावसायिक संकुल अशा विकास कामांसाठी जमिनी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे.
महापालिका व युरोपियन युनियन यांच्यात करार
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला. नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील प्राथमिकतांमधील सहकार्य क्षेत्र ओळख आणि विस्तारासाठी हा करार करण्यात आला आहे.
३,६६७ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
पॅन सिटी या घटकांतर्गत शहरावर देखरेख ठेवण्यासाठी चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत़ एकूण ३,६६७ कॅमेरे कार्यान्वित आहेत़ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही यामुळे कारवाई करणे शक्य झाले आहे.