उपराजधानीतील उच्चभ्रूंच्या सोसायटीत जुगार अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 10:48 AM2020-06-15T10:48:18+5:302020-06-15T10:53:30+5:30
उपराजधानीतील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदरेज आनंदम सोसायटीत पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा घातला. तेथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अत्यंत उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदरेज आनंदम सोसायटीत पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा घातला. तेथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड लाखांची रोकड आणि मोबाईलसह लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला. या छाप्यानंतर पहाटेपर्यंत नाट्यमय घडामोडी झाल्या. त्यामुळे पोलिसांनी कागदोपत्री कारवाई करून जुगाऱ्यांना अटक न करताच सोडून दिले. या घडामोडीमुळे एकीकडे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे शहरातील बडे व्यापारी आणि बिल्डर यांच्यात एकच खळबळ उडाली आहे.
बैद्यनाथ चौक ते मेडिकल चौक या मार्गावर गोदरेज आनंदम सोसायटी आहे. येथे शहरातील काही बडे उद्योजक, व्यापारी आणि बिल्डर रोज लाखोंचा जुगार खेळतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा घातला. यावेळी अभिषेक युगलकिशोर भट्टड (वय ३८), नितीन प्रभाकर महाजन (वय ४४), नरेश रामलाल सोनी (वय ५९), अजिंक्य अभय पालांदूरकर (वय ३०), नीलेश श्रीकिशन अग्रवाल (वय ३९), पवन अशोक सुधा (वय ३९) आणि सुहास गुणवंत पटेल (वय ४१) हे ताशपत्त्यावर जुगार खेळताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी एक लाख ६०५ रुपये जप्त केले.
पोलिसांवर आणला दबाव
या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातल्यानंतर प्रकरण जागच्याजागी मिटवण्यासाठी अनेक उच्चभ्रूंनी प्रयत्न केले, पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात आला. अनेकांचे फोन खणखणले. मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे पोलिसांनी कागदोपत्री कारवाई पूर्ण करून रविवारी पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांनी गुन्हा दाखल केला.
अटक नाही, सूचनापत्र देऊन सोडले
विशेष म्हणजे, जुगार अड्ड्यावर छापा घातल्यानंतर पोलीस जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेतात. त्यांना अटक करून जामीन देतात. येथे पकडण्यात आलेली मंडळी ‘बडी’ असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक न करता केवळ सूचनापत्र देऊन सोडून दिले. जुगाऱ्यांचे मोबाईलही जप्त केले नाहीत.