रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:09 PM2019-08-06T22:09:27+5:302019-08-06T22:11:14+5:30
रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालविणाऱ्या पाचपावलीतील शिंदेकर बंधूंकडे पोलिसांनी छापा घालून २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह एकूण ५ लाख, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालविणाऱ्या पाचपावलीतील शिंदेकर बंधूंकडे पोलिसांनी छापा घालून २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह एकूण ५ लाख, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पाचपावलीतील नंदागिरी मार्गावरील महादेव मंदिराजवळ पांडुरंग शिंदेकर यांची जिम व बहुद्देशीय संस्था आहे. या संस्थेतर्फे रमी क्लब चालविला जातो. वरकरणी रमी क्लबचे (मनोरंजन) नाव असले तरी तेथे पैशाचा जुगार चालतो. ही माहिती कळल्याने पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी पहाटे १. २० च्या सुमारास तेथे छापा घातला. यावेळी तेथे विनोद पांडुरंग शिंदेकर (वय ४२) आणि त्याचा भाऊ नरेंद्र पांडुरंग शिंदेकर (वय ५०), गुड्डू नारायण मुलपुरी (वय ५०, रा. खलासी लाईन सदर), जितेंद्र शामराव हेडावू (वय ३४, रा. संभाजी रोड, टिमकी) आणि सफीर बेग मुस्ताक बेग (वय ३०, रा. मोहम्मद अली कॉलेजसमोर, कळमना) तसेच २१ साथीदार जुगार खेळताना आढळले. पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात येताच जुगाºयांनी पळून जाण्यासाठी धडपड केली. मात्र, पोलिसांनी आधीच घेराबंदी केल्यामुळे २६ जुगारी हाती लागले. त्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १२,४०० रुपये, जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि वाहने असा एकूण ५ लाख, २४ हजार, ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम, सहायक निरीक्षक एस. सुरोशे, उपनिरीक्षक गोडबोले, खंडार, हवलदार संतोष ठाकूर, रामेश्वर कोहळे, दिनेश भोयर, नायक विनोद बरडे, अमित सातपुते, अरुण बावने, अभय साखरे, नितीन धकाते, नितीन वर्मा, सुमीत बावनगडे यांनी ही कामगिरी बजावली.
मनोरंजनाचा गोरखधंदा
शहरात अशा प्रकारचे अनेक क्लब आहे. मनोरंजनाच्या नावाखाली क्लबचे व्यवस्थापक धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करतात. त्यांच्याकडून तसेच पोलिसांकडून मिळवलेल्या परवानगीनुसार, रात्री १०. ३० पर्यंत हे क्लब सुरू असायला पाहिजे. मात्र, क्लबचे संचालक तेथे रात्रंदिवस जुगार अड्डा चालवितात. गेल्या वर्षी अशाच प्रकारे परिमंडळ चारमधील क्लबमध्येही अशीच कारवाई झाली होती.