खोऱ्याने रोकड ओढणाऱ्या कॅसिनो लॉबीला जीएसटीचा पॉवरफूल दणका
By नरेश डोंगरे | Published: September 25, 2023 05:23 PM2023-09-25T17:23:59+5:302023-09-25T17:25:30+5:30
गोव्यात साग्रसंगीत जुगाराचा खेळ : लोकमतची वृत्तमालिका नव्याने चर्चेला
नागपूर : देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करून मांडवी नदीतील ऑफशोर कॅसिनोत जुगाराचा खेळ मांडणाऱ्या कॅसिनो लॉबी पैकी एकाला थकित असलेल्या ११,१३९.६१ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नोटीस पाठवून जीएसटी आयुक्तांनी पॉवरफूल दणका दिला आहे. आज या संबंधीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर लोकमतने डिसेंबर २०२२ मध्ये प्रकाशित केलेल्या खळबळजनक वृत्तमालिकेचे कात्रण नव्याने सोशल मिडियावर वेगात फिरू लागले आहे.
नोटीसमध्ये सरकारने कंपनीला ११,१३९.६१ कोटींचा कर, व्याज आणि दंडासह १६ हजार ८२२ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. डेल्टा कॉर्पवर जीएसटीची थकबाकी जुलै २०१७ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी असल्याचे सांगितले जाते.
इवल्याशा गोव्यातील पणजीतील मांडवी नदीवर कॅसिनो लॉबीने अक्षरश: कब्जा केला आहे. आकर्षक रोशनाईने सजविलेली मोठमोठी जहाजं नदीच्या पात्रात उभी करून तेथे साग्रसंगीत जुगाराचा खेळ मांडला आहे. रस्त्यारस्त्यावर एजंट नेमून कॅसिनोत खानपान आणि जुगारासाठी मोफत कूपन देण्याचे आमिष दाखवून देश-विदेशातील पर्यटकांना या जहाजांवर पोहचविले जाते आणि तेथे नियम आणि कायदा धाब्यावर बसवून एका रात्रीत कोट्यवधींचा जुगार खेळविला जातो.
खोऱ्याने नोटा ओढणारी कॅसिनो लॉबी पर्यावरणाला तसेच मांडवीच्या जल आणि जलचरांनाही धोक्यात घालत असल्याची अभ्यासपूर्ण मालिका लोकमत वृत्त समूहाने १ ते १५ डिसेंबर २०२२ ला सर्वत्र प्रकाशित केली होती. संबंधित यंत्रणेतील काही जणांकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचेही या वृत्तमालिकेत नमूद करण्यात आले होते. या वृत्त मालिकेने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती.
दरम्यान, कॅसिनो लॉबीकडून होत असलेली प्रचंड आर्थिक उलाढाल या वृत्त मालिकेतून प्रकाशित झाल्याचे पाहून जीएसटीसह विविध विभागाने कॅसिनो लॉबीच्या अर्थकारणावर नजर रोखली होती. गुप्तपणे या आर्थिक उलाढालीची पाळमुळं शोधल्या जात असल्याचीही त्यावेळी संबंधित वर्तुळात चर्चा होती. या पार्श्वभूमीवर, आता कॅसिनो लॉबीपैकी डेल्टा कॉर्पोरेशनला जीएसटी आयुक्तांनी ११,१३९.६१ कोटींची नोटीस बजावण्यात आली आहे. जीएसटी आयुक्तांच्या या पॉवरफूल पवित्र्यामुळे कॅसिनो लॉबिला जबरदस्त हादरा बसला आहे.
जोर का धक्का !
कॅसिनो लॉबीची पोच थेट दिल्लीपर्यंत आहे. त्यात गोवा सरकारसाठी 'कॅसिनो' एक प्रकारचे एटीएम आहे. त्यामुळे वारंवार मांडवीतून कॅसिनो हटविण्याची मागणी होऊनही तिला केवळ निवडूकांच्या तोंडावरच हवा मिळते. नंतर ती मागणी मागे पडते. कॅसिनो चालकांचे कुठे अडले नडले तर ते दिल्लीतून वाट मोकळी करून घेतात. त्यामुळे दर सहा महिन्यांनी कॅसिनोचा परवाना मुदतवाढ घेतो.