कळमन्यात बाल्या गावंडेचा गेम
By admin | Published: January 24, 2017 02:41 AM2017-01-24T02:41:30+5:302017-01-24T02:41:30+5:30
उपराजधानीतील मटकाकिंग आणि कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ रवींद्र गोविंदराव गावंडे (वय ४०) याच्यासह
शहरात दोघांची हत्या : सदरमध्ये गर्दुल्याने वेल्डरला मारले
नागपूर : उपराजधानीतील मटकाकिंग आणि कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ रवींद्र गोविंदराव गावंडे (वय ४०) याच्यासह उपराजधानीत हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.
जेवणाच्या बहाण्याने बोलावून बाल्याची त्याच्या साथीदारांनीच निर्दयपणे हत्या केली. हत्येचे दोन गुन्हे आणि खंडणी वसुलीसह अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी बाल्या गावंडे महालमध्ये राहात होता. त्याच्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यात सहभागी असलेला आरोपी योगेश कुंभारे-सावजी तुकारामनगर, कळमना येथे राहतो. तोसुद्धा खतरनाक गुन्हेगार असून, कुख्यात गुंड भरत मोहाडीकर याच्या हत्याकांडाचा सूत्रधार आहे. बाल्या आणि योगेश दोघेही सध्या प्रॉपर्टी डीलिंगमध्ये सक्रिय होते. दरम्यान, योगेशने त्याच्या घरी रविवारी एका ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. यात अनेक गुन्हेगार सहभागी झाले होते. बाल्यालासुद्धा बोलावण्यात आले होते. त्यानुसार बाल्या त्याची पत्नी जयश्री आणि मुलीसोबत योगेशच्या घरी गेला होता. महिलांच्या जेवणाचा कार्यक्रम संपला तरी बाल्या, योगेश आणि त्याच्या गुंड साथीदारांचे खाणेपिणे सुरूच होते. त्यामुळे बाल्याने त्याची पत्नी जयश्री आणि मुलीला घरी पाठवून दिले. कटकारस्थानानुसार आरोपींनी मध्यरात्रीपर्यंत त्याला दारू पाजली. त्यानंतर एका ‘महिलेशी असलेल्या नाजूक संबंधाच्या’ चर्चेवरून आरोपी योगेश आणि साथीदारांसोबत बाल्याचा वाद झाला. मजबूत शरीरयष्टीचा बाल्या दारू चढल्याने शिवीगाळ करीत असल्याचे पाहून योगेश तसेच त्याच्या साथीदारांनी बाल्यावर घातक शस्त्रांचे सपासप घाव घालून त्याला जागीच ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी बाल्याचा मृतदेह बाजूच्या मैदानात फेकून दिला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. माहिती कळताच कळमन्याचे प्रभारी ठाणेदार राम मोहिते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले.
गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अभिनाष कुमार यांच्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीशी संपर्क साधला. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयाच्या आधारे आरोपी योगेश कुंभारे आणि त्याचा मामा राजकुमार यादव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या सांगण्यावरून या प्रकरणात शुभम धनोरे, पिंकी ऊर्फ गंगाबाई कुंभारे यांच्यासह अनेक आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)