‘बीकॉम’च्या परीक्षेचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:38 AM2017-10-25T01:38:54+5:302017-10-25T01:39:05+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरळीत झालेल्या परीक्षाप्रणालीला मंगळवारी अचानक धक्का बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरळीत झालेल्या परीक्षाप्रणालीला मंगळवारी अचानक धक्का बसला. हिवाळी परीक्षांमधील तिसºया टप्प्याची सुरुवातच विद्यार्थ्यांसाठी धावपळ व मनस्तापाची ठरली. काही परीक्षा केंद्रांवर ‘बीकॉम’च्या विद्यार्थ्यांचे आसन क्रमांकच नसल्याचे चित्र होते तर शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अवघ्या दोन तासअगोदर परीक्षा ओळखपत्रे मिळाली. महाविद्यालयांनी ऐनवेळी परीक्षा अर्ज भरल्यामुळे हा गोंधळ झाल्याचा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे महाविद्यालय व विद्यापीठ यांच्यामधील समन्वयाचा अभाव समोर आला आहे.
मंगळवारी ‘बीकॉम’च्या प्रथम सत्र परीक्षांना प्रारंभ झाला. वसंतराव नाईक शासकीय समाजविज्ञान संस्थेत विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र होते. सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर धक्काच बसला. कारण त्यांचा आसनक्रमांक सूचना फलकावर नमूदच नव्हता. परीक्षा ओळखपत्रावर हेच परीक्षा केंद्र असताना आमचा क्रमांक का नाही, असा प्रश्न केंद्र अधिकाºयांना विद्यार्थ्यांनी केला. मात्र आमच्याकडे आलेल्या यादीनुसारच आसनक्रमांक लिहिण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेर परीक्षा विभागात त्यांनी संपर्क साधल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांसाठी एका वेगळ्या खोलीत पेपर लिहिण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे तेथील अधिकाºयांकडून सांगण्यात आले. त्यानुसार अखेर वेळेवर या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली.
मात्र या गोंधळात विद्यार्थी तणावात आले होते. असा प्रकार शहरातील आणखी काही परीक्षा केंद्रांवरदेखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पेपरच्या दोन तासअगोदर मिळाले ओळखपत्र
दरम्यान, परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची ओळखपत्रेच ‘डाऊनलोड’ झाली नव्हती. तर बºयाच विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांमध्ये चुका होत्या. वेळेवर परीक्षा अर्ज भरलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तर दुपारी १२ च्या सुमारास परीक्षा ओळखपत्रे देण्यात आली. तेथूनच विद्यार्थी थेट परीक्षा केंद्रावर गेले. त्यामुळे त्यांची बरीच धावपळ झाली.