नागपुरात हायटेन्शन लाईनखाली जीवघेणा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 09:24 PM2018-03-06T21:24:57+5:302018-03-06T21:25:15+5:30
नियमानुसार हायटेन्शन लाईन खाली कुठलेही बांधकाम करता येत नाही. एखादा अपवाद वगळल्यास हायटेन्शन लाईन खालून रस्ता सुद्धा बांधता येत नाही. परंतु दाभा येथील सेंटर पॉर्इंट स्कूलने खास शाळेसाठी २०० मीटरचा रस्ता हायटेन्शन लाईनखाली बांधला आहे. या रस्त्याच्या खालून शाळेची शेकडो वाहने दररोज अवागमन करतात. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा जीवघेणा खेळ सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियमानुसार हायटेन्शन लाईन खाली कुठलेही बांधकाम करता येत नाही. एखादा अपवाद वगळल्यास हायटेन्शन लाईन खालून रस्ता सुद्धा बांधता येत नाही. परंतु दाभा येथील सेंटर पॉर्इंट स्कूलने खास शाळेसाठी २०० मीटरचा रस्ता हायटेन्शन लाईनखाली बांधला आहे. या रस्त्याच्या खालून शाळेची शेकडो वाहने दररोज अवागमन करतात. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा जीवघेणा खेळ सुरू आहे. शाळेच्या अरेरावीला ना शिक्षण विभाग ना महापारेषण थांबवू शकले. विशेष म्हणजे शाळेच्या एका भागातून हजारो होल्टेजच्या या तारा अगदी जवळून गेल्या आहे. त्यामुळे भविष्यात ही शाळा कदाचित गंभीर घटनेचे कारण ठरू नये.
विशेष म्हणजे नियमांकडे दुर्लक्ष करून शाळेचे निर्माणकार्य करण्यात आले आहे. याची माहिती प्रशासनाला आहे. त्यानंतरही शाळेवर कुठलीही कारवाई अथवा नोटीस सुद्धा दिलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हे अधिकारीही एखाद्या घटनेची वाट बघत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दाभ्याच्या टेकडीवर सेंटर पॉर्इंट स्कूलची भव्य इमारत आहे. शाळेला प्रवेशासाठी मार्गच नाही. शाळेच्या अगदी समोरून हायटेन्शन लाईन गेलेली आहे. या टेकडीच्या परिसरात ले-आऊट पडलेले आहे, मात्र कुठेही बांधकाम झालेले नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्नच नाही. वस्तीच नसल्याने रस्त्याची कुणाचीही मागणी नाही. परंतु सेंटर पॉर्इंट स्कूलने हायटेन्शन लाईनच्या अगदी खाली खास शाळेसाठी पक्का डांबरी रस्ता बनविला आहे. या रस्त्याच्या मधोमध हायटेन्शन लाईनचे मोठमोठे टॉवर आहे. लाईनच्या तारा लोंबकळलेल्या दिसतात. अशा जीवघेण्या लाईनच्या खालून दररोज शाळेच्या शेकडो वाहनांचे आवागमन होते. यात स्कूल बसेस, चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या संपूर्ण रस्त्यावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलेही उपाय केलेले नाही. मुलांना शाळेत लवकर सोडण्यासाठी या रस्त्यावरून वाहने वेगाने धावतात. शाळा सुटल्यानंतरही अशीच अवस्था असते. या रस्त्यावर हायटेन्शन लाईनचे मोठमोठे टॉवर उभारले आहे. वाहनांचा वेग लक्षात घेता, एखादे वाहन टॉवरवर आदळून अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
रस्त्यावर पथदिवे नाही
शाळेने आपल्या सोईसाठी २०० मीटरच्या जवळपास जो रस्ता बनविला आहे, त्या रस्त्यावर टॉवरचा अडथळा असतानाही पथदिव्यांची सोय केलेली नाही. विशेषत: या शाळेत आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम रात्रीपर्यंत चालतात.
हायटेन्शन लाईनजवळ कुठल्याच प्रकारचे बांधकाम नको
महापारेषणचे मुख्य अभियंता व्ही. बी. बढे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की हायटेन्शन लाईनच्या जवळपास कुठल्याच प्रकारचे बांधकाम करणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे शाळा तर असायलाच नको. त्यांना सेंटरपॉर्इंट शाळेबद्दल विचारले असता, त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना शाळेचे निरीक्षण करण्यास सांगितले. त्यांच्या अहवालावर पुढची कारवाई करण्यात येईल. ते म्हणाले की महापारेषण हायटेन्शन लाईनपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी आम्ही जागरूकता अभियान राबवित आहोत. लोकांनी पुढे येऊन असे प्रकार आम्हाला सांगावे.