लाखाेंच्या संख्येने माेरपंख येतात कुठून; पंख गळलेले की माेरांची कत्तल करून आणलेले
By निशांत वानखेडे | Published: August 28, 2023 07:08 PM2023-08-28T19:08:35+5:302023-08-28T19:09:12+5:30
सजावटीत माेरपंख लावले नाही तरी गणपती बाप्पा खुश हाेतील
नागपूर : लवकरच लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन घराेघरी हाेणार आहे. तयारीलाही वेग आला आहे. यात सजावट महत्त्वाची असते. या सजावटीला अधिक आकर्षित करण्यासाठी माेरपीसांचा वापर केला जाताे. मात्र हे माेरपंख माेरांची कत्तल करून तर आणले नाहीत, याचाही विचार करण्याचे आवाहन पक्षीप्रेमींकडून केले जात आहे. सजावटीत माेरपंख वापरले नाही तरी गणपत्ती बाप्पा खुश हाेतीलच, अशी भावना व्यक्त हाेत आहे.
दरवर्षी उत्सवाच्या काळात लाखाेंच्या संख्येने माेरपंख बाजारात विक्रीला येतात. गल्लाेगल्लीत माेरपीस विकणारे फिरताना दिसतात. शिवाय सजावटीचे साहित्य विक्रेते व फूटपाथ विक्रेत्यांकडेही सर्रास माेरपंखांची विक्री हाेते. विशेष म्हणजे माेर हा राष्ट्रीय प्राणी असून त्याची शिकार किंवा अवयवांची विक्री करणे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. मात्र बाजारात राजराेसपणे माेरपंखांची विक्री केली जाते. माेरांचे गळलेले पंख विक्रीस आणण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र एकाचवेळी लाखाेंच्या संख्येने पंख गळत असतील का, हा माेठा प्रश्न आहे. त्यामुळे उत्सवासाठी माेरांची कत्तल करून किंवा ओरबडून पंख काढले जात असण्याची शक्यता निसर्गसाथी फाउंडेशनचे प्रवीण कडू यांनी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांच्या गाेदामात लाखाे पंख
गेल्या वर्षी एका उत्तरप्रदेशच्या तरुणाला माेरपंख विक्री करताना हिंगणघाटमध्ये पकडण्यात आले हाेते. त्याने दिलेली माहिती धक्कादायक हाेती. हे पंख माेठ्या व्यापाऱ्याद्वारे किलाेने विकले जातात. नागपूर शहरातील अशा व्यापाऱ्यांच्या गाेदामात लाखाेंच्या संख्येने पंख राहत असल्याचे त्याने वनविभागाला सांगितले हाेते. यावरून हा व्यापार किती माेठा आहे, याचा अंदाज येताे. इतर शहरातही असा प्रकार हाेत असल्याचे नाकारता येत नाही.
उत्तरप्रदेश, राजस्थानाहून आणले जातात
मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेश व राजस्थान राज्यात माेठ्या प्रमाणात माेरपंखांची विक्री केली जाते. या राज्यामधूनच सर्वत्र माेरपंखांचा पुरवठा हाेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूरचे माेर घटले
नागपूर जिल्ह्यात १० वर्षापूर्वी ३० हजाराच्यावर माेरांची संख्या हाेती. आता ती ९ हजाराच्या खाली आली आहे. माेरपंखासाठीही माेरांची कत्तल हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे माेरांच्या संख्येबाबत व संरक्षणाबाबत वनविभागाची यंत्रणा फारसी गंभीर नाही. शिकारीचे एखाद्याच प्रकरणात कारवाई हाेते.
विणीच्या हंगामानंतर गळतात पंख
पावसाळा हा इतर पक्ष्यांप्रमाणे माेरांचाही प्रजननाचा काळ असताे. केवळ नर माेराला असे आकर्षक पंख असतात. विणीच्या हंगामानंतर त्यांचे पिसारे गळतात. मात्र एवढ्या माेठ्या प्रमाणात गळती हाेत नाही, असे कडू यांनी स्पष्ट केले.
वनविभागाने माेरपंखांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवावे. माेर हा गणपतीचे बंधू कार्तिकदेवाचे वाहन आहे. नागरिकांनी सजावटीत माेरपंखांचा वापर टाळून या राष्ट्रीय पक्ष्याचे रक्षण करावे.
- प्रवीण कडू, निसर्गसाथी फाउंडेशन