अनुचित व्यापार केल्यामुळे गणराया बिल्डर्सला दणका

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: July 1, 2024 07:01 PM2024-07-01T19:01:28+5:302024-07-01T19:02:02+5:30

Nagpur : फ्लॅटचे विक्रीपत्र करण्याचे किंवा १८ लाख व्याजासह देण्याचे आदेश

Ganaraya Builders slapped for doing unfair trade | अनुचित व्यापार केल्यामुळे गणराया बिल्डर्सला दणका

Ganaraya Builders slapped for doing unfair trade

राकेश घानोडे
नागपूर :
अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करणाऱ्या अन् सेवेत त्रुटी ठेवणाऱ्या गणराया बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सला एका प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जोरदार दणका दिला. आयोगाने प्रकरणातील तक्रारकर्त्या दाम्पत्याच्या अधिकारांचे संरक्षण करताना त्यांना उर्वरित रक्कम स्वीकारून वादग्रस्त फ्लॅटचे विक्रीपत्र करून द्या किंवा त्यांचे १८ लाख रुपये ९ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश गणराया बिल्डर्सला दिला. तसेच, तक्रारकर्त्या दाम्पत्यास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २५ हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही गणराया बिल्डर्सनेच द्यायची आहे.

प्रवीण व वैशाली मेश्राम, असे तक्रारकर्त्या दाम्पत्याचे नाव असून, ते मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. त्यांना आयोगाचे अध्यक्ष सचिन शिंपी, सदस्य चंद्रिका बैस व बाळकृष्ण चौधरी यांनी हा दिलासा दिला. मेश्राम दाम्पत्याने सुरुवातीला गणराया बिल्डर्सच्या मनीषनगर येथील प्रेरणा सोसायटीमधील एक ३-बीएचके फ्लॅट ४४ लाख ९९ हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्यापोटी त्यांनी २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत १५ लाख रुपये अदा केले होते. त्यानंतर गणराया बिल्डर्सने त्यांना समान किमतीमध्ये सोमालवाडा येथील सिल्व्हर ओक प्रेरणा सोसायटीमधील फ्लॅट घेण्याचा प्रस्ताव दिला. मेश्राम दाम्पत्याने तो प्रस्ताव स्वीकारून गणराया बिल्डर्सला २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पुन्हा तीन लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम विक्रीपत्र नोंदणीच्या वेळी देण्याचे ठरले होते. त्यासाठी दाम्पत्य कर्ज घेणार होते. त्यामुळे त्यांनी डिमांड नोटची मागणी केली होती; पण गणराया बिल्डर्सने त्यांना डिमांड नोट दिली नाही. तसेच, त्यांच्यासोबत संपर्कही तोडला. परिणामी, मेश्राम दाम्पत्याने १६ एप्रिल २०२२ रोजी गणराया बिल्डर्सला कायदेशीर नोटीस पाठविली. गणराया बिल्डर्सने त्यालाही प्रतिसाद दिला नाही. मेश्राम दाम्पत्याची सतत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याकरिता, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून न्याय मागितला होता.

 

Web Title: Ganaraya Builders slapped for doing unfair trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.