गांधी कुटुंबीयाला देशाचा रिमोट कंट्रोल हाती हवा आहे : उमा भारती यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 01:07 AM2019-04-03T01:07:27+5:302019-04-03T01:09:25+5:30
काँग्रेस नेतृत्व गैरजबाबदार आहे. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी नको आहे. २०१४ पूर्वी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून सत्तेचे रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवले होते. गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून ‘रेव्हेन्यू कलेक्शन’ करायचे असल्याचा आरोप भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांनी मंगळवारी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस नेतृत्व गैरजबाबदार आहे. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी नको आहे. २०१४ पूर्वी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून सत्तेचे रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवले होते. गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून ‘रेव्हेन्यू कलेक्शन’ करायचे असल्याचा आरोप भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांनी मंगळवारी केला.
नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ लोधी क्षेत्रीय समाजाच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम रजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उमा भारती उपस्थित होत्या. चौकीदार केवळ श्रीमंतांचाच असतो, प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यावर बोलताना उमा भारती म्हणाल्या की, प्रियंका गांधींना चौकीदारचा अर्थ समजला नाही. चौकीदार हा गावातही असतो आणि तो गावात कुठलीही गडबड होणार नाही, यासाठी दक्ष असतो. ‘न खाऊंगा न खाने दुंगा’म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला प्रत्येक शहर आणि गावात चौकीदार ठेवायचा आहे. काँग्रेसचा २०१९ च्या निवडणुकीतील नारा गरिबी हटाव, बेरोजगारी हटावचा आहे. जनतेने खरे तर त्यांनाच विचारले पाहिजे ५० वर्षे देशाची सत्ता भोगल्यानंतरही देशातील गरिबी, बेरोजगारी का नाही हटली. यावेळी आमदार विकास कुंभारे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, किशोर कुमेरिया आदी उपस्थित होते.
मी राजकारण सोडले नाही
मला इच्छित ठिकाणी उमेदवारी देण्याची पक्षाची तयारी आहे. त्यानंतर मंत्रिपदही मिळाले असते. पण, गंगा शुद्धिकरणाचे थोडे काम अजूनही शिल्लक आहे. उर्वरित कार्यासाठी मंत्री नाही तर लोकांना जोडणारा दुवा हवा आहे. या कार्यासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे, म्हणूनच यंदाची निवडणूक लढविली नाही. परंतु पुढच्या निवडणुकीत पक्ष देईल ती जबाबदारी निश्चितच सांभाळेल. राजकारणातील ‘कट ऑफ'ची ७५ वर्षे मानलीत तरी आपल्याकडे अजूनही १७ वर्षे शिल्लक आहेत. सध्या माझी क्रेडिबिलिटी गंगेशी कनेक्ट आहे. पक्षाने मला राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवून माझ्या कार्याचाही सन्मान केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राममंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा
काँग्रेस पक्षाकडून राममंदिराच्या मुद्यावर राजकारण होत आहे. राममंदिर हा प्रचाराचा मुद्दा नसून तो आमच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे भाजपाच्या मॅनिफे स्टोमध्ये राममंदिर निर्माणचा समावेश राहणार आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्या कामाची स्तुती करीत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनणार असल्याचे स्पष्ट केले.