गांधींना महात्माच्या चौकडीतून बाहेर काढणे गरजेचे : तुषार गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:50 PM2020-02-24T22:50:54+5:302020-02-24T22:52:28+5:30
गांधींची चर्चा जेव्हा केव्हा ‘महात्मा’ म्हणून होते, तेव्हा आपण सगळे त्यांचे भक्त होतो. भक्तीच्या याच चौकडीतून त्यांना बाहेर काढण्याचे माझे प्रयत्न असून, गांधी एक सामान्य माणूस म्हणून भावी पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधींची चर्चा जेव्हा केव्हा ‘महात्मा’ म्हणून होते, तेव्हा आपण सगळे त्यांचे भक्त होतो. भक्तीच्या याच चौकडीतून त्यांना बाहेर काढण्याचे माझे प्रयत्न असून, गांधी एक सामान्य माणूस म्हणून भावी पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.
एसजीआर नॉलेज फाऊंडेशन व चिटणवीस सेंटरच्यावतीने आयोजित ‘कस्तुरबा : रिमार्केबल लाईफ’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अमित गंधारे व योगिता चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले तर संचालन मृणाल नाईक यांनी केले.
आम्ही स्वत:ला बापूंचे वंशज मानून मुक्त झालो. पण, आम्ही कस्तुरबाचेही वंशज असल्याचा विसर पडला आणि त्यातूनच कस्तुरबा यांच्या चरित्राचा उगम होत असल्याचे तुषार गांधी म्हणाले. विवाह झाल्यानंतर मोहनदास मुद्दामून जेव्हा कठोर वागण्याचे प्रयत्न करून लागले, तेव्हा ‘पती की पतीची आई’ या द्वंद्वाचे उत्तर कस्तुरबा यांनी त्यांना दिले. तेच उत्तर म्हणजे गांधींनी दिलेल्या ‘अहिंसा पाठा’चे बीज होते. महात्मा गांधी यांच्यासोबत संसार करणे कठीण काम होते. जी व्यक्ती ज्या महान अभियानामुळे सतत वैचारिक स्थित्यंतरात होती, अशा व्यक्तीसोबत त्याला समजून उमजून आणि तेच अभियान स्वत: अंगीकारून पुढे जाणे म्हणजे कळसच. तरीही दोघांच्या नात्यातील भक्कम असले प्रेमच, त्यांना आयुष्यभर जोडून ठेवण्यास कारणीभूत ठरले. कस्तुरबा लाचार नव्हत्या तर स्वत:ही भक्कम विचारांच्या होत्या म्हणूनच ते शक्य झाले. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील भारतीय आणि स्थानिकांच्या अधिकारांसाठी लढताना महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा धडा म्हणा वा जनरल स्वॅटने काढलेला ‘हिंदू विवाह कायदा अमान्य’ असा आदेश, याचा परिणाम कस्तुरबा स्वत: आंदोलक झाल्या आणि स्व:अस्तित्वासाठी सत्याग्रह पुकारणाऱ्या पहिल्या महिल्या झाल्या. त्यातूनच डरबनमध्ये कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीविरोधातही तुरुंगातच राहून त्यांनी पुकारलेला सत्याग्रह कमालीचा ठरला. इंग्रज सरकारला माघार घ्यावीच लागली आणि कस्तुरबांच्या मागण्या त्यांना मान्यच कराव्या लागल्या.
दरम्यान मोठा मुलगा हरिलालला जडलेले दारूचे व्यसन आणि नंतर त्याने मुस्लीम धर्म स्वीकारल्याने कुटुंबावर होणारे शाब्दिक वार तिने झेलले. हे वार आजही गांधी कुटुंबीयांना झेलावे लागत आहेत. गांधीजींना चंपारण्यातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले ते कस्तुरबांमुळे. ज्या गावात महिला केवळ कपड्यांअभावी घराबाहेर पडू शकत नव्हत्या, त्याठिकाणी कस्तुरबा यांनी शाळा आणि देशातील पहिले स्वदेशी दुकान उघडले. तीनदा इंग्रजांनी ते उद्ध्वस्त केले आणि तिन्हीवेळा ते पुन्हा उभे राहिले. आज त्याठिकाणीसुद्धा त्यांच्या आठवणी विस्मरणात जात आहेत, अशी खंत तुषार गांधी यांनी व्यक्त केली. गांधीजी कारागृहात असताना मुंबईतील शिवाजी उद्यानातून ‘क्विट इंडिया’ची घोषणा देणाऱ्या कस्तुरबाच होत्या. एकूणच महात्मा गांधी आणि कस्तुरबा एकमेकांना पूरक होते, ते एकमेकांना समजून होते आणि म्हणूनच जसे गांधी होते तशाच कस्तुरबाही होत्या, असे तुषार गांधी यावेळी म्हणाले.