गांधीसागर तलाव ‘सुसाईड पॉर्इंट’
By admin | Published: October 5, 2016 03:07 AM2016-10-05T03:07:15+5:302016-10-05T03:07:15+5:30
उपराजधानीत तलावांत उडी घेऊन जीव देण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांत नागपुरातील तलावांत सुमारे ४०० जणांनी आत्महत्या केल्या.
सुरक्षा वाढविण्याची गरज : साडेचार वर्षात २१० नागरिकांच्या आत्महत्या
नागपूर : उपराजधानीत तलावांत उडी घेऊन जीव देण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांत नागपुरातील तलावांत सुमारे ४०० जणांनी आत्महत्या केल्या. यातील सर्वात जास्त २१० आत्महत्यांची नोंद गांधीसागर तलावात झाली. एकूण आकडेवारी लक्षात घेता शहरातील तलावांत सुरक्षा वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील तलावांत झालेल्या आत्महत्यांसंदर्भात शहर पोलीस विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. कुठल्या तलावांत किती आत्महत्या झाल्या, त्यात पुरुष व महिलांचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न विचारण्यात आले.गुन्हे शाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१२ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत नागपूर शहरातील ७ तलावांमध्ये ३३७ आत्महत्या झाल्या. यातील सर्वाधिक आत्महत्या गांधीसागर तलावात झाल्या. तलावांत झालेल्या एकूण आत्महत्यांच्या तुलनेत येथील टक्केवारी ६२ टक्के इतकी होती. अंबाझरी तलावांत या कालावधीमध्ये ६३ जणांनी जीव दिले. तर फुटाळा तलावात ४१ नागरिकांनी उडी घेऊन आयुष्य संपविले. (प्रतिनिधी)
पुरुषांची संख्या अधिक
नागपुरातील विविध तलावांमध्ये झालेल्या आत्महत्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. साडेचार वर्षांच्या कालावधीत २७३ पुरुषांनी तलावांत जीव दिला. महिलांची संख्या ६१ तर मुलांची संख्या ३ इतकी आहे. पुरुषांच्या सर्वाधिक १८८ आत्महत्या गांधीसागर तलावात झाल्या. तर अंबाझरी तलावात सर्वात जास्त २५ महिलांनी जीव दिला.
८ महिन्यांत ४१ आत्महत्या
२०१६ वर्षात ३१ आॅगस्टपर्यंत शहरातील तलावांमध्ये ४१ जणांनी आत्महत्या केली. यात पुरुषांची संख्या ३५ इतकी आहे. सर्वात जास्त २३ आत्महत्या या गांधीसागर तलावातच झाल्या. २०१५ मध्ये ८० नागरिकांनी तलावांत उडी घेऊन जीव दिला होता.