स्वतंत्र विदर्भासाठी गांधीगिरी
By admin | Published: April 2, 2015 02:40 AM2015-04-02T02:40:33+5:302015-04-02T02:40:33+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी गांधीगिरी स्टाईल आंदोलन केले.
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी गांधीगिरी स्टाईल आंदोलन केले. पान-फूल-स्टिकर असे आगळेवेगळे आंदोलन करून विदर्भाची मागणी रेटून धरली.
व्हेरायटी चौकात सकाळी ११ ते ३ पर्यंत समितीचे कार्यकर्ते सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना गुलाबाचे फूल देऊन नमस्कार करीत होते. ‘आपले राज्य विदर्भ राज्य’, ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ असे स्टिकर वाहनांना लावत होते. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य का झाले पाहिजे, या आशयाचे पत्रकही वाटत होते. समितीचे निमंत्रक राम नेवले यांनी छोटेखानी भाषणात आंदोलनाचे महत्त्व सांगितले. विदर्भातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचे पालन करावे, अन्यथा १ मे रोजी विदर्भभर भाजप सरकारचे पुतळे जाळून निषेध करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकांनी दिला.
आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, उमेश चौबे, राजकुमार तिरपुडे, विष्णू आष्टीकर, अरुण केदार, प्रभात अग्रवाल, हरिभाऊ केदार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)