गांधीजी म्हणाले, तुतारी न टोचता बैल हाकता येणार नाही का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:42 PM2019-10-01T22:42:22+5:302019-10-01T22:43:13+5:30
एक माणूस आपल्या बैलांना तुतारीने हाकलत जाताना दिसला. गांधीजी अस्वस्थ झाले. आपण कृतीतून प्राण्यांवर दया दाखविणार नाही, मग गोरक्षणाचा उपदेश देऊन उपयोग काय? त्यांनी गाडीवानाला बोलावले आणि नम्रपणे, ‘तुतारी न टोचता बैलांना हाकता येणार नाही का’, असे विचारीत प्राण्यांवर अत्याचार न करण्याचे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९३७-३८ साली गांधीजींनी सेवाग्राम येथे आश्रमाची स्थापना केली. आम्ही मुले वर्ध्याहून पायी सेवाग्रामला जायचो आणि त्यांच्या प्रार्थना सभांमध्ये सहभागी व्हायचो. त्यावेळी गोवंश सेवेसाठी गांधीजींनी गोसेवा संघाची स्थापना केली होती व जमनालाल बजाज त्याचे अध्यक्ष होते. दिवस आठवत नाही पण त्या दिवशी गोरक्षणावर सभा होती. गांधीजी यावर मार्गदर्शन करीत होते आणि नेमक्या त्याच वेळी एक माणूस आपल्या बैलांना तुतारीने हाकलत जाताना दिसला. गांधीजी अस्वस्थ झाले. आपण कृतीतून प्राण्यांवर दया दाखविणार नाही, मग गोरक्षणाचा उपदेश देऊन उपयोग काय? त्यांनी गाडीवानाला बोलावले आणि नम्रपणे, ‘तुतारी न टोचता बैलांना हाकता येणार नाही का’, असे विचारीत प्राण्यांवर अत्याचार न करण्याचे आवाहन केले.
मानेवाडा रोडच्या ज्ञानेश्वरनगर जवळ प्रगती कॉलनी येथे राहणारे दत्तात्रय बर्गी यांच्या मनात गांधीजींच्या अनेक आठवणी घर करून आहेत व त्यातीलच हा प्रसंग. बर्गी यांचे वय आता ९५ वर्षांचे आहे. ते मूळचे वर्ध्याचे. गांधीजींचे वर्धेला नेहमी येणे जाणे असायचे. साधारणत: १९३५ चा काळ होता. गांधीजी वर्धेला आले की ते मगनवाडी येथे थांबायचे आणि बॅचलर रोडवर दररोज सकाळ-संध्याकाळ फिरायला जायचे. नेमक्या याच रोडवर बर्गी यांच्या वडिलांचे घर होते. गांधीजी फिरायला निघत तेव्हा कधी त्यांच्या हातात काठी असायची किंवा त्यांची सून व नात सोबत असायची. ते या मार्गाने फिरताना दिसले की आम्ही मुले ‘महत्मा गांधीजी की जय...’, असे ओरडायचो आणि ते स्मित करायचे. सेवाग्राम आश्रमाच्या स्थापनेनंतर त्यांचा मुक्काम तिकडे हलला. त्यानंतर आम्ही मुले पायी सेवाग्रामला जायचो. शाळेत असतानाच तेथील प्रताप व्यायामशाळेचे प्रभारी डॉ. जगन्नाथ मोहदे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही गांधीजींच्या विचारांकडे वळलो आणि पुढच्या काळात राष्ट्रकार्यात सहभागी होऊ लागलो. त्यांच्या सभांमध्ये सहभागी होऊ लागलो, त्यांचे साहित्य वाचायला लागलो. गांधीजींच्या वाढदिवसाचा एक गमतीदार प्रसंगही त्यांनी येथे नमूद केला. लोकांनी त्यांच्यासाठी खादीचे कपडे व कस्तुरबा यांच्यासाठी साडी आणली होती. तेव्हा ‘बापूसाठी आणल्यावर बा साठी आणण्याची काय गरज’, असा मिश्किल सवाल गांधीजींनी केल्याचे बर्गी यांनी सांगितले.
राष्ट्रीय काँग्रेस आणि ब्रिटिश सरकार यांच्यातील चर्चेनंतर वसाहत सरकारच्या निवडणुका, १९३९ साली सुरू झालेले दुसरे महायुद्ध आणि युद्धाच्या नावाखाली ब्रिटिशांनी चालविलेली लूट, या सर्व धामधुमीच्या काळातील प्रसंगांच्या आठवणी त्यांनी नोंदविल्या. १९४० च्या काळी आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय युवक संघाची स्थापना करण्यात आली आणि यात आम्ही सक्रिय कार्यकर्ते म्हणून सहभागी झालो. पाहता पाहता ही मध्य प्रांतातील सर्वात मोठी युवकांची संघटना झाली. काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनानंतर ‘अंग्रेजो भारत छोडो’ चा नारा निनादला आणि सर्वत्र वणवा पेटला. नागपूर, चिमुर आदी ठिकाणी उडालेला असंतोषाचा भडका, कार्यकर्त्यांची धरपकड व सात दिवस कारागृहात राहण्याच्या आठवणी सांगितल्या. विद्यार्थी दशेतील मधुकर बोकरे (नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू), नाना भोजेकर, देवीदास देशमुख, वामन कांबळी असे सहकारी सोबत असल्याचे बर्गी यांनी सांगितले.
पुढे स्वातंत्र्याचा आनंदोत्सव आणि गांधीजींच्या हत्येनंतरची अस्वस्थता त्यांनी मांडली. १९६६ ला दत्तात्रय बर्गी नागपूरला आले आणि येथेच स्थायिक झाले. न्यू इंग्लिश शाळेत शिक्षकाची नोकरी सुरू केली. पुढे सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रभाषा प्रचार समिती, स्वदेशी चळवळ व अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. आयुष्यभर गांधीजींच्या विचारांशी प्रामाणिक राहिल्याची मार्मिक भावना त्यांनी व्यक्त केली.
बॉम्ब आणायला नागपूरला आलो होतो
चले जाओच्या आंदोलनाच्या वेळी आम्हा तरुणांची अहिंसात्मक आंदोलनाची दिशा भरकटली होती. त्यावेळी राष्ट्रीय युवक संघाची मुख्य शाखा नागपूरला होती व आनंदराव कळमकर, एन.एन. राव, अण्णासाहेब बानाईत, एन.एन. तिडके, आपू अंजनकर, वामन पराळ आदी प्रमुख पदाधिकारी होते. येथे काही ठिकाणी बॉम्बही बनविल्या जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. मी वर्धा शाखेचा प्रमुख होतो व बॉम्ब नेण्यासाठी मी नागपूरला आलो होतो. मात्र यादरम्यान प्रभाकर गव्हाणकर नामक कार्यकर्ता बॉम्बसह सापडला आणि पोलिसांनी धरपकड सुरू केली. त्यामुळे आम्हाला परत जावे लागल्याची आठवण बर्गी यांनी सांगितली.