२ ऑक्टाेबरला सेवाग्राममध्ये पुन्हा घुमणार गांधीजींचा आवाज
By निशांत वानखेडे | Published: September 19, 2024 06:40 PM2024-09-19T18:40:38+5:302024-09-19T18:43:01+5:30
अखिलेश झा आणणार ‘ताे’ ऐतिहासिक काेलंबिया ग्रामाेफाेन : गांधीजी ऐकत असलेल्या भजनांचीही रेकाॅर्ड
नागपूर : महात्मा गांधी १९३१ साली दुसऱ्या गाेलमेज परिषदेत सहभागी हाेण्यासाठी लंडनला जाणार हाेते. या बातमीमुळे जगभरातील पत्रकार, रेडिओ ब्राॅडकास्टर्सनी लंडनकडे धाव घेतली हाेती. त्यावेळी अनेक ग्रामाेफाेन कंपन्यानी गांधीजींचा आवाज रेकार्ड करण्यासाठी परिषदेच्या आयाेजकांकडे प्रयत्न चालविले हाेते. यात अमेरिकेची काेलंबिया ग्रामाेफाेन कंपनी यशस्वी ठरली हाेती. राजकीय चर्चा न करण्याच्या अटीवर गांधीजींनी साधलेला हा संवाद त्यावेळी प्रचंड गाजला हाेता. ब्रिटीशांनी भारतात मात्र त्याचा प्रसार हाेवू दिला नाही. हाच रेकार्डेड ग्रामाेफाेनमधील आवाज येत्या २ ऑक्टाेबर राेजी सेवाग्राम येथे गुंजणार आहे.
जुन्या ग्रामाेफाेनच्या तबकड्या जमा करण्याचा छंद असलेले दिल्लीचे अखिलेश झा यांच्याकडे हा ऐतिहासिक ठेवा संग्रही आहे. एवढेच नाही तर गांधीजींना आवडत व ते प्रत्यक्ष ऐकत असलेल्या ‘वैष्णव जन ताे तेने कहिए...’ किंवा ‘रघुपती राखव राजा राम...’ अशा भजनांच्या ग्रामाेफाेनवरील रेकार्डही झा यांच्या संग्रही आहेत. झा यांनी माेडताेड झालेल्या ग्रामाेफाेनच्या या तबकड्या जाेडताेड करून सुस्थितीत केल्या आहेत. सेवाग्राम येथे २ ऑक्टाेबरला हाेणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमात ते सहभागी हाेणार असून या ग्रामाेफाेनमधील रेकार्ड ते ऐकविणार आणि त्यांच्याशी संबंधित किस्सेही सांगणार आहेत.
साेपान जाेशी यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी
महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर लहान मुलांसाठी पुस्तकांचे लेखन करणारे आणि गांधी विचाराच्या कुटुंबाशी जुळलेले लेखक, पत्रकार तसेच विज्ञान, पर्यावरण, राजकारण, खेळ ,शेती, तंत्रज्ञान आदी विषयावर लेखन करणारे साेपान जाेशी यांचे व्याख्यान सेवाग्राम येथे सकाळी हाेणार आहे.