हिंदुत्व अन् धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या वादातून गांधींची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2023 08:53 PM2023-03-03T20:53:24+5:302023-03-03T20:54:02+5:30
Nagpur News नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले.
नागपूर : महात्मा गांधींना मारणे सोपे नव्हते. परंतु स्वातंत्र्यानंतर भारत कसा असेल याविषयी चर्चा सुरू होती. नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले.
अमरावती मार्गावरील विनोबा विचार केंद्रात ‘गांधीज एसासीन द मेकिंग ऑफ नथुराम गोडसे अँड हिज आयडिया ऑफ इंडिया’ या आपल्या पुस्तकावर धीरेंद्र झा यांनी भाष्य केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी नेत्या लीलाताई चितळे होत्या. व्यासपीठावर श्याम पांढरीपांडे उपस्थित होते. धीरेंद्र झा म्हणाले, गोडसे आणि आरएसएसचे संबंध होते. परंतु हत्येच्या वेळी नथुराम गोडसे आरएसएसचा सदस्य नव्हता, असे चौकशीत मांडण्यात आले. गांधींच्या हत्येनंतर आरएसएसचे मुख्यालय सील करण्यात आले होते.
गांधीजी हे राष्ट्राचा आत्मा होते. त्यांना सर्वसमावेशक भारत हवा होता. गांधीनंतर हिंदुराष्ट्राच्या विचारातूनच दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. आरएसएस आणि हिंदू महासभेची जी विचारधारा होती तीच विचारधारा गोडसेची होती, असे झा यांनी सांगितले. ज्येष्ठ गांधीवादी नेत्या लीलाताई चितळे यांनी राज्यघटना हा खरा धर्मग्रंथ असून त्यावरच आघात करण्यात येत असल्याची खंत व्यक्त करून आज देशाला रामकथेची नव्हे तर गांधी कथेची गरज असल्याचे मत व्यक्त केले. संचालन वंदन गडकरी यांनी केले. प्रास्ताविक श्याम पांढरीपांडे यांनी केले.
.............