गांधींच्या सच्च्या वचनात होते मंत्राचे सामर्थ्य : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 11:30 PM2019-10-02T23:30:14+5:302019-10-02T23:31:20+5:30

ज्या वचनात सच्चेपणा असतो, त्यात मंत्राचे सामर्थ्य असते. महात्मा गांधी यांच्याबद्दल तरी हेच लागू पडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तथा लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांंनी केले.

Gandhi's true Word had the power of mantra: Suresh Dwadashiwar | गांधींच्या सच्च्या वचनात होते मंत्राचे सामर्थ्य : सुरेश द्वादशीवार

गांधींच्या सच्च्या वचनात होते मंत्राचे सामर्थ्य : सुरेश द्वादशीवार

googlenewsNext
ठळक मुद्देशतकोत्तर जयंतीनिमित्त वि.सा. संघात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९१५ मध्ये देशाला माहीतही नसणारे आणि काँग्रेसच्या अधिवेशनात अगदी मागच्या रांगेत बसणारे महात्मा गांधी १९२० मध्ये या देशाचे नेते झाले. एका अनभिज्ञ माणसामागे देश उभा राहणे ही जगाला अचंबित करणारी बाब आहे. त्यांच्या वचनात सच्चाई होती. ज्या वचनात सच्चेपणा असतो, त्यात मंत्राचे सामर्थ्य असते. महात्मा गांधी यांच्याबद्दल तरी हेच लागू पडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तथा लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांंनी केले.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या छायाचित्राचे अनावरण झाले. हे औचित्य साधून विदर्भ साहित्य संघाच्यावतीने ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ या विषयावर प्रा. द्वादशीवार यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाची आणि पैलूंची द्वादशीवार यांनी मांडणी केली. ते म्हणाले, गांधींच्या आयुष्याला अनेक वळणे होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी नेमका तोच आधार घेतला. खरे तर गांधी कुणालाच उमगले नाहीत. अगदी त्यांचे राजकीय अनुयायी असणाऱ्या नेहरूंना आणि वल्लभभाईंना देखील ते पूर्णपणे उमगू शकले नाही.
गांधींबद्दलच्या अपसमजाला महाराष्ट्रातील विचावंतच कारणीभूत असल्याचे सांगून द्वादशीवार म्हणाले, मार्क्सवादी-समाजवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी आणि आंबेडकरवादी असा चार विचारवंतांचा वर्ग महाराष्ट्रात आहे. मार्क्सवाद्यांचा सर्वात मोठा वैचारिक पराभव गांधींनी केला. मार्क्सवाद्यांना देशात श्रमिकांचे राज्य आणायचे होते. तरीही ८० टक्के शेतकरी-मजूर असलेली जनता ‘महात्मा गांधी की जय’ असेच म्हणायची. हिंदुत्वावाद्यांनी गांधींवर अनेक आक्षेप घेतले. फाळणीसाठी त्यांना जबाबदार धरले जात असले तरी फाळणीचा विचार गांधींच्या उदयापूर्वीपासूनचा होता, हे लक्षात घ्यावे. आंबेडकरवाद्यांनी गांधीना नेहमीच दूर ठेवले तर देशाला गांधी समजावून सांगण्याची जबाबदारी खुद्द गांधीवाद्यांना पेलता आली नाही.
गांधींच्या शब्दात सामर्थ्य होते. त्यांच्या आवाहनावरून लोकांनी शाळा, नोकऱ्या, वकिली सोडल्या. ‘करा वा मरा’ सांगितल्यावर माणसे मरायलाही तयार झाली. गांधी महात्मा होण्याला हेच कारण आहे. असे असले तरी एका मराठी माणसाने त्यांची हत्या केली हा महाराष्ट्रावर लागलेला कलंक आहे. तो पुसता आला नाही. आजही त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून उन्माद साजरा केला जातो. ही घटनाच त्यांचे अमरत्व सांगणारी बाब आहे. माणसांमधील नाते आहे, तो पर्यंत गांधी जिवंतच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार प्रकाश एदलाबादकर यांनी मानले. शहरातील अनेक नामवंत मंडळी यावेळी उपस्थित होती.

Web Title: Gandhi's true Word had the power of mantra: Suresh Dwadashiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.