गाेंडखैरी काेळसा खाणीची जनसुनावणी वादळी ठरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 10:24 PM2023-07-12T22:24:56+5:302023-07-12T22:25:56+5:30
Nagpur News नागपूर शहरापासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावर कळमेश्वर तालुक्यात गाेंडखैरी येथील काेळसा खाणीचा पट्टा अदानी समुहाला देण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) ने गुरुवार १३ जुलै राेजी जनसुनावणी आयाेजित केली आहे.
नागपूर : नागपूर शहरापासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावर कळमेश्वर तालुक्यात गाेंडखैरी येथील काेळसा खाणीचा पट्टा अदानी समुहाला देण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) ने गुरुवार १३ जुलै राेजी जनसुनावणी आयाेजित केली आहे. मात्र आधीच या पट्ट्यातील २४ ग्रामपंचायती, पर्यावरण कार्यकर्त्यांनी खाणीला विराेध दर्शविणारे पत्र एमपीसीबीला सादर केले आहे. त्यामुळे जनसुनावणी वादळी ठरण्याची शक्यता आहे.
नागपूर शहराला लागूनच असलेल्या गोंडखैरी कोळसा खाणीचा पट्टा हा अदानी समूहाला देण्यात आला असून येथे भूमिगत कोळसा खाण सुरु करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय. तशी प्रक्रिया देखील केंद्रानं सुरू केली आहे. गोंडखैरी, वडधामना या नव्याने विकसित होत असलेला निमशहरी भाग आहे. सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीच्या नागपूर मेट्रो परिसरामधील २२ गावे या कोळसा खाणीने प्रत्यक्ष आणि आजूबाजूची ८३ गावे अप्रत्यक्षरीत्या बाधित हाेणार आहेत. त्यामुळे खाणीला पर्यावरणवाद्यांचा विराेध असताना ग्रामस्थांनीही प्रचंड विराेध नाेंदविला आहे.
काेळशा खाणीमुळे बाधित हाेणाऱ्या बहुतेक ग्रामपंचायतींनी प्रस्तावित खाणीविराेधात ठराव पारीत करून प्रदूषण नियंत्रण मंडळाला धाडले आहे. यामध्ये गाेंडखैरीसह खैरी (पन्नासे), धामना (लिंगा), द्रुगधामना, वडधामना, निलडाेह, नागलवाडी, साेनेगाव (निपानी), व्याहाड, पेठ (कालडाेंगरी), सुराबर्डी, सावली, सेलू, दहेगाव, सहजापूर, आलेसूर, पिपळा, सुरदवलामेटी, माराेतीनगर वाडी आदी गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्हा काॅंग्रेस कमिटी आणि राष्ट्रवादी नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी अदानीच्या काेळसा खाणीविराेधात पत्र सादर केले आहे. काही आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनीही विराेध दर्शविला आहे. सर्व गावकऱ्यांनी प्रस्तावित खाणीविराेधात तीव्र आंदाेलनाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत कळमेशृवर तालुक्यातील कारली गावाच्या तलावाजवळ सकाळी ११ वाजतापासून ही जनसुनावणी सुरू हाेणार असून गदाराेळ हाेण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.
८६२ हेक्टरचा पट्टा
कळमेश्वर तालुक्यात गाेंडखैरी येथे ८६२ हेक्टरमध्ये ही खाण प्रस्तावित आहे. अदानी पाॅवरने भूमिगत काेळसा खाण सुरू करण्याचा विचार केला आहे. या खाणीतून दरवर्षी ३ दशलक्ष मेट्रिक टन काेळशाचे उत्पादन हाेईल, अशी अपेक्षा आहे. मात्र या खाणीमुळे हाेणारे जलवायू प्रदूषण, पाण्याचा वापर, गावांचे विस्थापन अशा अनेक गाेष्टी प्रभावित करणार असल्याने गावकऱ्यांनी तीव्र विराेध दर्शविला आहे.