गाणार यांना पुन्हा संधी

By Admin | Published: May 27, 2016 02:41 AM2016-05-27T02:41:05+5:302016-05-27T02:41:05+5:30

नागपूर शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार नागो गाणार यांना परत भाजपकडून उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ganeer again gets a chance | गाणार यांना पुन्हा संधी

गाणार यांना पुन्हा संधी

googlenewsNext

महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाकडून घोषणा : अनेक इच्छुकांचा हिरमोड
नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार नागो गाणार यांना परत भाजपकडून उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषदेतर्फे त्यांच्या नावाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. गाणार यांना उमेदवारी मिळणार असल्यामुळे भाजपतील अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. स्वच्छ प्रतिमा, शिक्षकांसाठी घेतलेली भूमिका आणि भाजपमधील राजकारणाचे आत्मसात केलेले गणित यामुळे गाणार यांनाच परत संधी मिळाली आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये होऊ घातली. भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा पुन्हा एकदा कायम राखण्यासाठी भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती. विद्यमान आमदार नागो गाणार हे प्रामाणिक असले तरी त्यांनी पक्षातीलच काही नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांविरुद्ध चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे त्यांच्याबाबत भाजपच्या एका विशिष्ट गटात नाराजीचा सूर होता.
भाजपतील बरेच नेते व शिक्षक परिषदेतील पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक होते. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहकार आघाडी अध्यक्ष संजय भेंडे, जिल्हा परिषद व ग्राम पंचायत आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रमेश मानकर, माजी महापौर डॉ. कल्पना पांडे यांच्यासह शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, योगेश बन यांचीही नावे उमेदवारीसाठी आघाडीवर होती. उमेदवार बदलायचा असल्यास शिक्षक परिषदेच्याच नेते किंवा कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी शिक्षक परिषदेची भूमिका होती. त्यामुळे शिक्षक परिषदेच्या नेत्यांमध्ये चढाओढ वाढली होती व आपापल्या परीने सर्व जण प्रयत्नाला लागले होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या उमेदवार निवड समितीची बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमदार निवास येथे झाली. तीत जिल्हा अध्यक्ष, कार्यवाह, विभाग पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी सदस्य यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर गुरुवारी पुण्यात परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. यात नागो गाणार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (प्रतिनिधी)

गाणारांना कामाची मिळाली पावती
नागपूर शिक्षक मतदारसंघावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वर्चस्व संपुष्टात आणून महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नागोराव गाणार यांनी तत्कालीन आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांचा पराभव केला होता. शिक्षकांच्या समस्या रेटून धरणारे आमदार अशी नागो गाणार यांनी आपली ओळख निर्माण केली होती. विशेषत: विधान परिषदेत शिक्षक किंवा शिक्षणाशी संबंधित काहीही मुद्दा असला तरी गाणार हे अभ्यासपूर्वक त्यावर बोलतात. हाती घेतलेला मुद्दा तडीस नेण्याकडे त्यांचा भर असतो. शिवाय शिक्षक परिषदेच्या कामाच्या विस्तारातदेखील त्यांनी मौलिक योगदान दिले. शिक्षकांचे प्रश्न लावून धरत असतानाच त्यांनी भाजपातील राजकीय गणितदेखील चांगल्यारीतीने आत्मसात केले. या सर्व बाबींमुळे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले.
संघटनेच्या निर्देशांचे पालन करणार : गाणार
यासंदर्भात नागो गाणार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुण्यातूनच आपल्याला परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी जाहीर झाल्याचे कळविल्याचे स्पष्ट केले. यंदा उमेदवारीसाठी चढाओढ जास्त होती. मी स्वत:ला शर्यतीपासून दूर ठेवले होते. संघटनेच्या निर्देशांचे मी आतापर्यंत पालन करत आलो आहे व यापुढेदेखील तेच करणार, असे गाणार यांनी सांगितले.

Web Title: Ganeer again gets a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.