Ganesh Chaturthi 2018; ‘गाणपत्य आचार्य परंपरा’; श्री गुरुपंचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 09:53 AM2018-09-13T09:53:23+5:302018-09-13T09:54:20+5:30
श्रीगणेशाच्या निर्गुणनिराकार ओंकार स्वरूपाची उपासना करणाऱ्या वर्गाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. गाणपत्य संप्रदाय गुरुपरंपरेवर आधारित एक विशेष लेखमाला लोकमत खास गणेशभक्तांसाठी घेऊन येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: श्रीगणेशाच्या निर्गुणनिराकार ओंकार स्वरूपाची उपासना करणाऱ्या वर्गाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. कोणत्याही संप्रदायाचे वैभव पाहताना त्याचा एक महत्त्वाचा निकष म्हणजे त्यामध्ये असलेली गुरुपरंपरा हा होय. या गुरुपरंपरेवर आधारित एक विशेष लेखमाला लोकमत खास गणेशभक्तांसाठी घेऊन येत आहे. कुठेही प्रसिद्ध न झालेली व वाचनात न आलेली ही माहिती यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी येथे असलेल्या लोकमान्य महाविद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख प्रा. स्वानंद पुंड यांनी लिहिली आहे.
श्रीगुरुपंचक
गवान गणेशाच्या निर्गुणनिराकार ओंकार स्वरूपाची उपासना करणाऱ्या वर्गाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. शैव, वैष्णव, शाक्त या संप्रदायांप्रमाणेच गाणपत्य संप्रदायाचा अत्यंत वैभवशाली असा इतिहास आहे. कोणत्याही संप्रदायाचे वैभव पाहताना त्याचा एक महत्त्वाचा निकष म्हणजे त्यामध्ये असलेली गुरुपरंपरा हा होय. गाणपत्य संप्रदायात गुरुपंचक रूपात ही आद्यगुरु परंपरा वर्णिली आहे. सांप्रदायिक भूमिकेनुसार भगवान श्री गणेशांच्या हातातील कमळ ब्रह्मदेवरूपात, अंकुश विष्णूरूपात, मुद्गल रविरूपात, परशु शिवरूपात तर पाश गुणेशरूपात प्रगट होत असतात. विश्वाच्या संचालनासाठी पाच रूपातील हे परमेश्वर जीवाच्या कल्याणासाठी पंचगुरू रूपांमध्ये अवतार धारण करतात. श्रीब्रह्मदेव श्रीभृगु रूपात, श्री शंकर श्रीशुकाचार्य रूपात, श्रीविष्णू वेदव्यास रूपात, श्रीसूर्य श्रीमुद्गलाचार्य रूपात तर श्रीगुणेश गणकाचार्य रूपात अवतार धारण करतात. या पाच गुरूंना गुरुपंचक असे म्हणतात. श्रीभृगुंना श्रीगुरु, श्रीशुकाचार्यांना परमगुरु, श्री वेदव्यासांना परात्परगुरु श्री मुद्गलाचार्यांना परमेष्ठीगुरु आणि श्री गणकाचार्यांना परब्रह्मगुरु असे संबोधले जाते. हेच गुरुपंचक कलियुगामध्ये अनुक्रमे श्रीब्रह्मानंंद, श्रीआदिशंकराचार्य, श्रीगिरिजासुत, श्रीगणेशयोगिंद्राचार्य आणि श्री गौडपादाचार्य अशा रूपात अवतीर्ण होत असते, अशी गाणपत्य संप्रदायाची भूमिका आहे. या गुरुपंचकासह भगवान श्रीभृशुंडी महाराज आणि महर्षी गृत्समद यांनाही गाणपत्य संप्रदायात विशेष आदराचे स्थान आहे. आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहणाऱ्या या लेखमालेच्या रूपात आपण या गाणपत्य आचार्य परंपरेचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करू.