Ganesh Festival 2019; गणपतीला वाहण्यासाठी असलेल्या २१ बहुगुणी पत्रींचे अनोखे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 02:59 PM2019-09-02T14:59:41+5:302019-09-02T15:01:04+5:30
नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात भारत विकास परिषद व निसर्ग विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने २१ पत्रींच्या रोपट्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीला वाहण्याची प्रथा असलेल्या व काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या २१ बहुगुणी पत्रींचे अनोखे प्रदर्शन नागपुरात २ व ३ सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे. नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात भारत विकास परिषद व निसर्ग विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने २१ पत्रींच्या रोपट्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
गणपतीला वाहण्याच्या विविध पत्रींची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरविले असल्याची माहिती भारत विकास परिषदेचे वसंत काकडे यांनी दिली. प्रदर्शनात पिंपळ, अर्जुनसादडा, जाई, डाळिंब, कण्हेर, शमी, बोर, पांढऱ्या दुर्वा, डोरले किंवा काटेरिंगणी, पांढरा धोत्रा, रुई, हादगा, माका, आघाडा, तुळस, मालती, बेल, देवदार, केवडा, शंखपुष्पी व लाल जास्वंद यांची रोपटी ठेवण्यात आली आहेत. या रोपट्यांच्या मागच्या भागात त्या त्या रोपट्याचे नाव, इंग्रजीतील नाव व त्याचे आरोग्यविषयक महत्त्वही स्वतंत्र फलकांवर लावण्यात आले आहे.
गणपतीला वाहण्यात येत असलेल्या या पत्रींचे प्रदर्शन भरविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे काकडे यांनी सांगितले. या प्रदर्शनामागचा हेतू अधिक विशद करताना त्यांनी, गणेश उत्सवाच्या निमित्ताने जनसामान्यांचा या झाडांशी येणारा संपर्क वाढावा व त्याचे महत्त्व अधोरेखित व्हावे असे म्हटले. या प्रदर्शनाला गणेश मंदिरात येणारा प्रत्येक नागरिक आवर्जून भेट देत आहे.