गणेशोत्सव झाले हायटेक; परवानगीसाठी वापरा अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:58 AM2018-08-11T10:58:46+5:302018-08-11T11:00:42+5:30
गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घेण्यासाठी होणारा त्रास आता कमी होणार आहे. नागपूर महापालिकेतर्फे ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळांची परवानगीसाठी होणारी भटकंती थांबणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घेण्यासाठी होणारा त्रास आता कमी होणार आहे. नागपूर महापालिकेतर्फे ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळांची परवानगीसाठी होणारी भटकंती थांबणार आहे.
गणेशोत्सवाच्या मंडपासाठी महापलिकेच्या झोनचे सहायक आयुक्त व वाहतूक आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र या परवानगीसाठी चांगलीच भटकंती व्हायची. अनेकदा मनस्तापही सहन करावा लागायचा. हा त्रास कमी झाल्याने गणेश मंडळांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे गणेश मंडळांना आवश्यक सर्व परवानगी या एकाच अॅपवरुन मिळविता येणार आहेत.
ई-मेलवर मिळणार माहिती
परवानगीसाठी मंडळाला नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीनंतर परवानगीची प्रक्रिया सुरू होईल. अॅपवर नोंदणी करून विविध प्रकारची माहिती सादर केल्यानंतर झोनचे सहायक आयुक्त व वाहतूक आयुक्त यांच्याकडे ही माहिती जाईल. यानंतर सहायक आयुक्त सर्व कागदपत्रांची पडताळणी करून सदर अर्ज मंजूर अथवा नामंजूर करू शकतात. याबाबतची माहिती अर्जदाराला ई-मेलद्वारे पाठविली जाईल. यानंतर झोन स्तरावर मनपाने सुरू केलेल्या एक खिडकी योजनेच्या खिडकीवर जाऊन गणेश मंडळांना या माहितीच्या पीडीएफ प्रिंटसह इतर आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर येथून गणेश मंडळांना परवानगीचे पत्र मिळणार आहे.