गणेश विसर्जन : नागपुरात पीसी टू सीपी सारेच रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:07 PM2018-09-24T17:07:44+5:302018-09-24T17:48:32+5:30
घरच्या गणपतीला हात जोडून कर्तव्यावर निघालेले पोलीसदादा तब्बल २२ तास अविश्रांत कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी दाखविलेली सतर्कता अन् परिश्रमामुळे नागपुरातील गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे, हे करा, ते करा असे सांगून गप्प न बसता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी थेट रस्त्यावर उतरून स्वत:ही पहाटेपर्यंत दक्षपणे कर्तव्य बजावल्याने नागपुरात गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रविवारी सकाळी ७ वाजतापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत शहर पोलीस दलातील पीसी टू सीपी (पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस आयुक्त) पर्यंत शिस्तीत आणि समंजसपणे कर्तव्य बजावत राहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरच्या गणपतीला हात जोडून कर्तव्यावर निघालेले पोलीसदादा तब्बल २२ तास अविश्रांत कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी दाखविलेली सतर्कता अन् परिश्रमामुळे नागपुरातील गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे, हे करा, ते करा असे सांगून गप्प न बसता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी थेट रस्त्यावर उतरून स्वत:ही पहाटेपर्यंत दक्षपणे कर्तव्य बजावल्याने नागपुरात गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रविवारी सकाळी ७ वाजतापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत शहर पोलीस दलातील पीसी टू सीपी (पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस आयुक्त) पर्यंत शिस्तीत आणि समंजसपणे कर्तव्य बजावत राहिले.
गणोशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणावरून वाद होतात. हाणामाऱ्या घडतात. अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचीही स्थिती निर्माण होते. यावेळीही अनेक शहरात असे कटू प्रकार घडले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मात्र सुरुवातीपासूनच गणेशोत्सवादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन केले होते. १० दिवस बाप्पांचा महाउत्सव पार पडल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देताना कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची विशेष तयारी केली होती. परिणामी बाप्पांचा महाउत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला.
विसर्जनाच्या प्रमुख ठिकाणी फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव, सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, कोराडी, कळमना तलाव, महादेव घाट कामठी, वाडी आणि हिंगणा भागातील काही ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. वाहतुकीला अडसर निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणांहून वाहतुकीचा मार्ग तात्पुरता वळविण्यात आला होता. मिरवणुकीच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहून काही समाजकंटक छेड काढणे, संवेदनशील ठिकाणी दगडफेक करणे, घोषणाबाजी करणे, गुलाल उधळणे असे प्रकार जाणीवपूर्वक करू पाहतात. ते होऊ नये म्हणून रस्त्यारस्त्यावर तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. उपद्रवी व्यक्तींना जेरबंद करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस मिरवणुकीत सहभागी झाले होते. अशा प्रकारे नियोजनपूर्वक बंदोबस्त करण्यात आल्याने शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
पोलीस आयुक्त पहाटेपर्यंत
रविवारी सकाळी ७ वाजतापासून सात पोलीस उपायुक्तांसह २०० पोलीस अधिकारी आणि १७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताच्या कर्तव्यावर रुजू झाले होते. तब्बल २२ तास ते अविश्रांत कर्तव्यावर होते. त्यातील अनेकांनी जेवणही उभ्या उभ्याच केले होते. विशेष म्हणजे, बंदोबस्ताचे नियोजन करणारे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय स्वत: अनेक विसर्जनस्थळी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करीत होते. दिवसभर फिरून त्यांनी वेगवेगळ्या भागातील रस्त्यावरील बंदोबस्ताची पाहणी केली. विसर्जनासाठी सर्वाधिक गर्दी फुटाळा तलावावर होती. तेथे रात्री ७ नंतर ९ आणि त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता पोलीस आयुक्त आले. गर्दी वाढल्याचे पाहून ते पहाटे ३.४५ वाजतापर्यंत फुटाळा तलावावर हजर होते.