मुस्लीम कुटुंबाच्या घरात आरतीसोबतच नमाज पठणही, सोहेल खान करताहेत सर्वधर्म - समभावाचे जतन

By कमलेश वानखेडे | Published: September 3, 2022 08:02 AM2022-09-03T08:02:13+5:302022-09-03T08:02:40+5:30

Ganesh Mahotsav:

Ganesh Mahotsav: Sohail Khan Performs Namaz Along With Aarti In A Muslim Family's Home All Religions - Preserving Equality | मुस्लीम कुटुंबाच्या घरात आरतीसोबतच नमाज पठणही, सोहेल खान करताहेत सर्वधर्म - समभावाचे जतन

मुस्लीम कुटुंबाच्या घरात आरतीसोबतच नमाज पठणही, सोहेल खान करताहेत सर्वधर्म - समभावाचे जतन

googlenewsNext

- कमलेश वानखेडे
नागपूर : गणराया म्हणजे चैतन्याचे, उत्साहाचे प्रतीक; पण नागपूरच्या सोहेल खान यांनी गणरायाला सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले. मुस्लीम असूनही गेल्या दहा वर्षांपासून ते आपल्या घरी गणरायाची स्थापना करीत आहेत. त्यांचे कुटुंबीयही  मोठ्या भक्तिभावाने दहा दिवस  गणेशाची विधीवत पूजाअर्चा व भक्ती करतात. त्यांच्या घरी होणाऱ्या या उत्सवात त्यांचे शेजारीदेखील पूर्ण भक्तिभावाने सहभागी होतात. 

हे करताना सोहेल खान व त्यांचे कुटुंबीय आपल्या मुस्लीम धर्माच्या पाच वेळेच्या नमाजदेखील नित्यनेमाने करतात. त्यांच्या घरी ज्या हॉलमध्ये गणपती विराजमान आहे, त्याच हॉलमध्ये  बाजूला नमाजही सुरू असते. त्यामुळे भक्तीचे एक वेगळे दर्शन आपल्याला नागपूरच्या खान कुटुंबीयांच्या घरी पाहायला मिळते. त्यामुळे गणेशोत्सव हा श्रद्धेसोबतच कशा प्रकारे समाजात प्रेम, एकता, बंधुता निर्माण करण्याचे एक माध्यम आहे, हे दिसून येते. सोहेल खान राहतात तिथे बहुतांश हिंदू व इतर समाजाचे लोक राहतात. मात्र, गणेशोत्सवातील दहा दिवस त्यांच्या शेजारी राहणारे व परिसरातील हिंदू लोक कुटुंबासह या उत्सवात सहभागी होतात. आरतीला उपस्थित राहतात. घरून प्रसाद आणतात. संस्कृतीची ही खरी ओळख असल्याची भावना शेजारी व्यक्त करतात.

मुलाचा आग्रह,  पित्याने पूर्ण केला
- सोहेल खान हे नागपूरच्या पार्वतीनगर, रामेश्वरी भागात राहतात. त्यांचा मुलगा सीझान खान याला गणपतीबद्दल एक वेगळी आपुलकी व प्रेम आहे. सुरुवातीला सीझान हा मातीचा गणपती स्वतः तयार करून घरी त्याची स्थापना करायचा. 
- त्यानंतर त्याने  घरी दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी वडिलांकडे मागितली. 
- वडिलांनीही कसलाच संकोच न करता मुलाला गणेशाची स्थापना करण्याची परवानगी दिली. तेव्हापासून हे कुटुंब गणेशोत्सव साजरा करत आहे.

 

Web Title: Ganesh Mahotsav: Sohail Khan Performs Namaz Along With Aarti In A Muslim Family's Home All Religions - Preserving Equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.