आकाराच्या चौकटीत अडकले विघ्नहर्ता! मूर्तीकारांना नोंदणी आवश्यक अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 09:54 PM2022-07-06T21:54:23+5:302022-07-06T21:54:52+5:30
Nagpur News या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चार फुटांहून अधिक उंचीची मूर्ती स्थापित करता येणार नाही. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिपत्र काढून दिशानिर्देश जारी केले आहे.
नागपूर : या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चार फुटांहून अधिक उंचीची मूर्ती स्थापित करता येणार नाही. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिपत्र काढून दिशानिर्देश जारी केले आहे.
परिपत्रकात मूर्तीचा आकार, मूर्तीकारांना नोंदणी व नियमाचे उल्लंघन केल्यास करण्यात येणारी कारवाई, याची माहिती देण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांत कोरोना संकटामुळे गणेशोत्सव धडाक्यात साजरा करता आला नाही. निर्बंधामुळे या वर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्याच्या उत्साहावर थोडा परिणाम झाला आहे. मात्र मूर्तीकारांसाठी मूर्तीचा आकार व शुल्क भरून नोंदणी व कारवाईसंदर्भात स्पष्टता आली आहे.
शहरातील तलावांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. अन्यथा शहरातील तलावांचे अस्तित्वच संकटात येणार आहे. या वर्षीही तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात येणार आहे. कृत्रिम तलावातच विसर्जन करावे लागेल. मूर्तीचा आकार वगळता दुसरे कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले नाही. मूर्तीच्या आकारासोबतच उंची निश्चित करण्यात आली आहे. यामुळे विसर्जन सोयीचे होणार आहे.
पीओपी मूर्तीच्या विक्रीवर बंदी
मनपाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाची व्यवस्था बघता सार्वजनिक व घरगुती मूर्तीची उंची व आकार निश्चित करण्यात आला आहे. सार्वजनिक मंडळासाठी ४ बाय ४ तर घरगुती मूर्ती २ बाय २ फूट बसविण्याला परवानगी राहणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीची विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
मूर्तीचा आकार ठरविणे चुकीचे : गजभीये
कोरोना संकट संपले आहे. सर्व निर्बंध हटविण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मूर्तीचा आकार निश्चित करणे अयोग्य असल्याची भूमिका हिलटॉप येथील एकता गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख प्रकाश गजभिये यांनी मांडली. वर्षानुवर्षे मोठ्या मूर्तीचे विसर्जन केले जात आहे. अशा परिस्थितीत आकार ठरविणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तलाव वाचविण्यासाठी आकार कमी केला : महल्ले
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशमूर्तीचा आकार निश्चित करण्याचा अधिकार मनपाला दिला आहे. शहरातील तलावांचे संरक्षण व्हावे, यासाठी मूर्तींचा आकार निश्चित करण्यात आला आहे. तलावात या वर्षीही मूर्ती विसर्जनला बंदी घालण्यात आल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा) डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
मूर्तिकारांना नोंदणी बंधनकारक अन्यथा दंड
-नागपूर मनपा क्षेत्रातील मूर्तीकार, कारागीर व उत्पादक पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून मूर्ती बनवितात. त्यांना मनपाची परवानगी घ्यावी लागेल.
-जे मूर्तीकार दररोज १०० हून अधिक मूर्ती तयार करतात, त्यांना मनपाकडे आपल्या नावाची नोंदणी करावी लागेल. संबंधित व्यावसायिकांना नोंदणी शुल्क म्हणून ५०० रुपये व अनामत रक्कम ५ हजार रुपये जमा करावे लागेल.
- मूर्ती विसर्जन व्यवस्थित व सुरक्षित होण्यासाठी मंडळांना मनपाकडे नोंदणी करावी लागेल.
- परवानगी न घेता मूर्तीची निर्मिती, साठवणूक व विक्री करताना नियमांचे उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड वसूल करण्याचा प्रस्ताव आहे.
-दिशा -निर्देशांचे पालन करण्याचे अधिकार विभागीय कार्यालयाचे मुख्य स्वच्छता अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.