गणेशोत्सवात गोळा होते ३५० टनाच्यावर निर्माल्य : निर्माल्यातून खतनिर्मितीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:35 AM2019-09-07T00:35:20+5:302019-09-07T00:37:20+5:30

सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे विसर्जनाच्या वेळी निर्माल्यही तलावात टाकण्याऐवजी ते कलशामध्ये रीतसर गोळा केले जात असून यामुळे महापालिकेच्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

Ganesha festival gathers over 5 tonnes | गणेशोत्सवात गोळा होते ३५० टनाच्यावर निर्माल्य : निर्माल्यातून खतनिर्मितीला चालना

गणेशोत्सवात गोळा होते ३५० टनाच्यावर निर्माल्य : निर्माल्यातून खतनिर्मितीला चालना

Next
ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनासाठी भक्तांमध्ये सकारात्मकता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी सर्वात खास सण झाला आहे. श्रीगणेशाशी संबंधित सर्वच गोष्टी भक्तांसाठी श्रद्धेचा विषय. पण गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा महत्त्वाचा विषय झाला असून भाविकांमध्येही याबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. प्रदूषण होईल अशा गोष्टी टाळण्यासाठी भाविकच पुढाकार घेत असून निर्माल्याबाबत हीच भावना दिसून येत आहे. सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे विसर्जनाच्या वेळी निर्माल्यही तलावात टाकण्याऐवजी ते कलशामध्ये रीतसर गोळा केले जात असून यामुळे महापालिकेच्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाला चालना मिळाली आहे.
सर्वसाधारणपणे हार, फुले, बेल, शमी, दुर्वा आदींचा वापर दररोजच्या पूजेसाठी केला जातो. शिवाय भाविकगण मित्रांच्या, नातेवाईकांच्या आणि मंडळातर्फे स्थापित बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. त्या वेळी मोठ्या श्रद्धेने बाप्पाच्या चरणी वाहण्यासाठी सोबत फुले, हार, दूर्वा, नारळ, पेढे, प्रसाद आदी घेऊन जातात. त्यातील बहुतेक भक्तांना वाटण्यात जातो व शिल्लक राहिलेला भाग ज्यात, पुड्यांचे आवरण, पिशव्या, वाहिलेले आणि जुने झालेल्या फुलांचे हार, माचिस, अगरबत्तीचे खोके, नारळाच्या करवंट्या, सजावटीचे मखर आदी निर्माल्य होऊन फेकून देण्यात येते. कितीतरी घरे आणि मंडळांमधून दिवसाभरात हे निर्माल्य सतत तयार होत असते ज्याला तलावात, वाहत्या पाण्यात फेकण्याची पूर्वापार प्रथा चालत आलेली आहे. हेच निर्माल्य पुढे सडल्यामुळे पाण्यात प्रदूषण व तलावातील आॅक्सिजनची मात्रा कमी करण्यास कारणीभूत ठरते. यावर उपाय म्हणून शहरातील निर्माल्य संकलित करून जैविक व अजैविक असे वर्गीकरण करून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प महापालिकेने सुरू केला आहे. मात्र गेल्या काही वर्षात मनपा व सामाजिक संस्थांद्वारे होणाऱ्या जनजागृतीमुळे निर्माल्य प्रदूषणाचा विषय लोकांना पटायला लागला आहे. त्यामुळे आता ते तलावात फेकून देण्याऐवजी मनपातर्फे ठेवलेल्या कलशामध्ये जमा करणे भक्तांना अधिक महत्त्वाचे वाटते.
फुटाळा तलावातून ३५ टन निर्माल्य
दरवर्षी शहरातील पाच सहा तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था असायची. मात्र यावर्षी महापालिकेने सक्करदरा, गांधीसागर, सोनेगाव, नाईक तलाव या तलावांमध्ये विसर्जन करण्यावर प्रतिबंध घातला असून आता मोठ्या गणपतींच्या विसर्जनासाठी आता केवळ फुटाळा तलावातच परवानगी देण्यात आली आहे. येथे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात होते. या ठिकाणी पालिकेने दोन निर्माल्य कलश ठेवले आहेत. धरमपेठ झोनचे अधिकारी टेंभेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे १२०० च्या जवळपास मंडळाचे गणपती तर सव्वा लाखाच्यावर घरगुती गणपती विसर्जित केले जातात. विसर्जनासाठी येथे कृत्रिम टॅँकचीही व्यवस्था केली आहे. यातून दररोज दोन ते तीन टन निर्माल्य जमा होते. विसर्जनाच्या शेवटच्या दोन दिवसात ५ ते ६ टन निर्माल्य गोळा होते. अशाप्रकारे या तलावातून दहा दिवसात ३५ टनाच्यावर निर्माल्य गोळा केले जाते.

शहरात ३०० ठिकाणी निर्माल्य कलश
नागपूर शहरात विविध चौकामध्ये विसर्जनासाठी महापालिकेद्वारे ३०० कृत्रिम टॅँक लावण्यात येत आहेत. सध्या २०० टॅँक लावण्यात आले असून शेवटपर्यंत उर्वरित १०० लावण्यात येणार आहेत. या प्रत्येक टॅँकजवळ ५०० लिटर क्षमता असलेले ३०० निर्माल्य कलश लावले जात आहेत. या प्रत्येक कलाशातून दररोज १०० ते १५० किलो निर्माल्य गोळा होत असल्याची माहिती टेंभेकर यांनी दिली. शेवटच्या दिवशीपर्यंत जवळपास ३०० टन निर्माल्य गोळा होण्याची माहिती त्यांनी दिली.
६० ते ६५ टन जैविक खत निर्मिती
महापालिकेने भांडेवाडी येथे जैविक खत निर्मितीचा प्रकल्प चालविला आहे. गणेशोत्सवाच्या काळात ३५० टनाच्या जवळपास निर्माल्य गोळा होणार असून ते महापालिकेद्वारे भांडेवाडीत पोहचविले जाणार आहे. त्यातून जैविक आणि अजैविक निर्माल्याचे विलगीकरण करून हार, फुले, दुर्वा, फळांचे सालटे आदी जैविक निर्माल्यापासून ६० ते ६५ टन जैविक खत तयार होण्याची शक्यता आहे. हे खत शहरातील उद्यानांमध्ये उपयोगात आणले जात असल्याचे टेंभेकर यांनी सांगितले.
निर्माल्य तलावात पडल्यानंतर ते सडल्यामुळे अनएरोबिक स्थिती निर्माण होते व पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. तलावात प्रतिलिटर ६ मिलिग्रॅम ऑक्सिजनचे प्रमाण आवश्यक आहे. मात्र ते ४ ते ४.५ मिलिग्रॅम/लिटरपर्यंत असते. विसर्जनाच्या काळात ते २.५ मिलिग्रॅम/लिटरवर येते. त्याखाली गेले तर तलावातील इकोसिस्टीम नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे हे निर्माल्य तलावात जाता कामा नये. लोकांमध्ये याबाबत सकारात्मक जागृती दिसून येत आहे.
 कौस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजील

 

Web Title: Ganesha festival gathers over 5 tonnes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.