कागदी लगद्यांपासून बनताहेत गणेशमूर्ती : हरित लवादाच्या निर्णयाची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:19 AM2018-08-27T11:19:12+5:302018-08-27T11:21:01+5:30
‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अनेक जण कागदी लगद्यापासून तयार झालेल्या गणेशमूर्तींना प्राधान्य देतात. परंतु प्रत्यक्षात अशा मूर्ती या जलसाठ्यांसाठी प्रचंड धोकादायक असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अनेक जण कागदी लगद्यापासून तयार झालेल्या गणेशमूर्तींना प्राधान्य देतात. अगदी राज्य शासनानेदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते. परंतु प्रत्यक्षात अशा मूर्ती या जलसाठ्यांसाठी प्रचंड धोकादायक असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. आश्चर्याची बाब म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाने यासंदर्भात निर्णय दिला असतानादेखील मागील दोन वर्षांपासून याची अंमलबजावणी झालेली नाही. पर्यावरणासाठी विविध उपक्रम हाती घेतलेल्या राज्य शासनाकडून यासंदर्भात कधी पुढाकार घेण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याची ओरड झाल्याने राज्य शासनाने ३ मे २०११ रोजी पर्यावरण विभागाच्या माध्यमातून सणांच्या पर्यावरणपूरक साजरीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे जारी केल्या होत्या. कागदी लगद्यांपासून बनलेल्या मूर्तींना प्रोत्साहन द्यावे, अशी भूमिका शासनाने घेतली होती. २०१० साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तीसोबत कागद असतील तर पाण्यात विसर्जन करू नये अशा मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने या सर्वांचा कसलाही अभ्यास न करता शासन निर्णय जारी केला होता. प्रत्यक्षात कागदी लगदा हादेखील धोकादायक असल्याची बाब संशोधनातून समोर आली.
हिंदू जनजागृती समितीचे शिवाजी वटकर यांनी २०१५ मध्ये राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचा अहवाल तसेच सांगली येथील पर्यावरणतज्ज्ञ डॉ.सुब्बाराव यांच्या संस्थेने केलेल्या संशोधनाचा अहवाल सादर करण्यात आला होता.
कागदामध्ये असलेल्या रसायनांमुळे प्राणवायूचे प्रमाण शून्यावर आल्याचे निदर्शनास आले होते. तसेच कागदाचा लगदा पाण्यात गेल्यावर त्याचे बारीक कण होतात व त्याचा फटका जलचरांना बसतो, असेदेखील एका अभ्यासातून समोर आले होते. राष्ट्रीय हरित लवादाने कागदी लगद्याचा वापर मूर्तींमध्ये करण्यात येऊ नये, असा निर्णय दिला होता व या मूर्तींचा प्रचार-प्रसार न करण्याचे निर्देश शासनाला दिले होते. ३० सप्टेंबर २०१६ रोजी हा निर्णय देण्यात आला होता. मात्र त्यानंतर दोन वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील राज्य शासनाने यासंदर्भात पुढाकार घेतलेला नाही. याबाबत कुठलीही सूचना संबंधित विभागांनादेखील देण्यात आलेली नाही.
१० किलोच्या मूर्तीमुळे हजार लिटर पाणी प्रदूषित
मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेने कागदी लगद्याच्या मूर्तींचा पाण्यावर काय परिणाम होतो यावर संशोधन केले होते. या संशोधनानुसार १० किलोच्या कागदी मूर्तीमुळे सुमारे १००० लिटर पाणी प्रदूषित होते. कागदामुळे पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅडमिअम, टायटॅनिअम आॅक्साईड इत्यादी विषारी धातू मिसळले जातात, असेदेखील या संशोधनातून समोर आले होते. हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर करण्यात आला होता.
शासनाने तत्परता दाखवावी
राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलबंदीसंदर्भात तत्परता दाखविली होती. गणेशोत्सवाच्या काळात जलप्रदूषणाचा धोका वाढतो. अनेक संकेतस्थळाच्या माध्यमातूनदेखील कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे कागदी लगद्यांचा वापर थांबावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.