आझमगडच्या मातीतून साकारणार गणेशमूर्ती; नागपुरात पहिल्यांदा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 08:37 PM2022-07-25T20:37:28+5:302022-07-25T20:37:56+5:30
Nagpur News नागपुरातील काही मूर्तिकार यंदाच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील आझमगडच्या मातीपासून सुबक, सुंदर, टिकाऊ गणेशमूर्ती साकारत आहेत. हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे.
नागपूर : नागपुरातील काही मूर्तिकार यंदाच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील आझमगडच्या मातीपासून सुबक, सुंदर, टिकाऊ गणेशमूर्ती साकारत आहेत. हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे. नागपूरच्या मातीप्रमाणे या मातीवर कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज नाही. माती ‘रेडी टू यूज’ आहे. या मातीपासून पहिल्यांदाच लहान आणि मोठी मूर्ती तयार होणार आहेत. माती महाग असली तरीही मूर्तीची किंमत वाढणार नाही.
स्थानिकच्या तुलनेत मातीची किंमत जास्त
आझमगडची माती टिकाऊ आहे. त्यामुळे अन्य मातीच्या तुलनेत या मातीपासून तयार होणारी मूर्ती सुबक, सुंदर, रेखीव बनते. पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाचे अध्यक्ष सुरेश पाठक म्हणाले, व्यावसायिक दृष्टिकोनातून शोध घेतला असता आझमगडच्या मातीचा पर्याय सापडला आणि खाणीतून काढलेली माती नागपुरात आणली. ३२ टन मातीची (एक ट्रक) किंमत ८५ हजार रुपये आहे. यात वाहतूक आणि अन्य खर्चाचा समावेश आहे. चार मूर्तिकार मिळून मातीचा ट्रक मागविला आहे. मातीत खडे, दगड नसल्यामुळे प्रक्रिया करण्याची गरज नाही. लवचीक असल्यामुळे थेट पाण्यात टाकून मूर्ती तयार करण्यासाठी वापरता येते. अन्य शाडूमातीचा विचार केल्यास ती गुजरातमधून येते. या मातीच्या तुलनेत आझमगडची माती ३० रुपयांनी स्वस्त आहे. अर्थात ३२० रुपयांत ५० किलो माती पडते. या मातीपासून तयार होणारी मूर्ती टणक असल्यामुळे रंग कमी प्रमाणात शोषून घेते. तसेच मूर्ती रेखीव बनते व उठून दिसते. मातीचा खर्च जास्त असला तरीही मूर्तीची किंमत वाढविण्यात येणार नाही.
नागपुरात सावरगाव व आंधळगावची माती
पाठक म्हणाले, नागपुरातील सर्वच मूर्तिकार नरखेड तालुक्यातील सावरगाव आणि भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील माती मूर्ती तयार करण्यासाठी बोलवतात. सावरगावच्या चार टन मातीसाठी ७ हजार आणि आंधळगावच्या सहा टन मातीसाठी ७ हजार रुपये खर्च येतो. चार दिवस प्रक्रिया केल्यानंतर माती मूर्ती बनविण्यासाठी तयार होते. पण या मातीपासून तयार केलेल्या मूर्तीला अनेकदा तडे जातात. शिवाय शाडूमातीच्या मूर्ती ठिसूळ बनतात. त्या जास्त अंतरावर पाठविता येत नाहीत.
आझमगड मातीचा प्रयोग पहिल्यांदा नागपुरात करण्यात येत आहे. याची माहिती सर्व मूर्तिकारांना झाल्यामुळे पुढे सर्वच मूर्तिकार या मातीचा उपयोग करतील. पुढे या मातीला आणि मातीपासून तयार केलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींना मागणी वाढणार असल्याचे सुरेश पाठक यांनी स्पष्ट केले.