विदर्भाचे गणेश : भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अदासा येथील शमी विघ्नेश्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 11:09 AM2022-08-31T11:09:59+5:302022-08-31T11:12:40+5:30
दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पौषवैद्य संकष्टी चतुर्थीला येथे यात्रा भरते.
विजय नागपुरे
कळमेश्वर (नागपूर) :विदर्भातील अष्टविनायकांपैकी पहिला मान असलेला गणपती म्हणजे श्रीक्षेत्र अदासा येथील शमी विघ्नेश्वर. नागपूरहून ४० कि.मी., तर श्रीक्षेत्र धापेवाडा येथून ४ कि.मी.वर अदासा हे छोटंसं गाव वसलेलं आहे. मनोकामना पूर्ण करणाऱ्या विघ्नेश्वरावर भाविकांची असिम श्रद्धा आहे. पुराणातील उल्लेखाप्रमाणे या ठिकाणाचं नाव अदोषक्षेत्र. बोलीभाषेत त्याचा अपभ्रंश होऊन पुढे अदासा असे नाव पडले.
संगमरवर दगडापासून निर्मित ११ फूट उंच व ७ फूट रुंद असलेली ही गणेशाची मूर्ती भक्तांचे संकट दूर करत असल्याने वर्षभर येथे मोठी गर्दी असते. गणपती देवस्थानाचा परिसर २० एकरांत आहे.
मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, त्यावरील शिल्पकला, उंच कळस, फुलांची बाग, सभागृह यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते. मंदिराच्या वरील भागाला दुर्गा देवीचे मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, कालभैरव मंदिर, जंबुमाळी मारोती ही देवस्थाने आहेत. त्याचबरोबर, महारुद्र हनुमानाचे मोठे मंदिर आहे. सुर-असुरांच्या युद्धात देवांचा विजय झाल्यानंतर हनुमान येथे विश्रांतीसाठी आले होते, अशी आख्यायिका आहे.
मंदिराच्या पायथ्याशी येथे पाय बावली आहे. रस्त्याच्या पलीकडे असे गणेश कुंड आहे. पूर्वी गणपतीच्या अंघोळीसाठी या गणेश कुंडातून पाणी नेत असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या वरच्या बाजूला एक भुयार असून, तिथे महादेवाची पिंड आहे. या भुयारातून एक गुप्त मार्ग असून, तो नागद्वार व रामटेकपर्यंत गेला असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे बांधकाम जवळपास पाच हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते.
अशी आहे आख्यायिका
देव आणि असुर यांच्यात झालेल्या समुद्रमंथनानंतर देवांना अमृत प्राप्त झाले. असुरांचा पराभव झाला, तेव्हा इंद्राचे स्थान प्राप्त करण्यासाठी व स्वर्गावर आधिपत्य निर्माण करण्यासाठी गुरू शुक्राचार्यांनी बळीराजाला १०० अश्वमेध यज्ञ करायला सांगितले. बळीराजाला यज्ञ करण्यास रोखण्यासाठी भगवान विष्णूने देवमाता अदितीच्या गर्भातून वामन अवतारात जन्म घेतला. त्यानंतर, वामन अवतारातील भगवान विष्णूने याच ठिकाणी शमी वृक्षाखाली अदास्याला गणेशाची उपासना केली. उपासनेने प्रसन्न होऊन गणेशाने शमी वृक्षातून प्रकट होत विष्णूला आशीर्वाद दिला. त्यामुळेच या गणेशाला ‘शमी विघ्नेश्वर’ नावानेही ओळखले जाते. यावेळीच वामन अवतारानेच या मूर्तीची स्थापना केल्याचे मानले जाते. दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पौषवैद्य संकष्टी चतुर्थीला येथे यात्रा भरते.