गणेशोत्सवात गुलालाची उधळण एक कोटींची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 09:32 PM2019-09-03T21:32:44+5:302019-09-03T21:34:04+5:30
पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही वर्षांपासून तरुण-तरुणींमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सवाची क्रेझ निर्माण झाली आहे. सजावट ते थेट विसर्जनापर्यंत सर्वकाही निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता हा उत्सव साजरा करण्याकडे तरुणांचा ओढा दिसून येत आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी विसर्जनाच्या मार्गावर गुलालाचा थरच्या थर जमलेला दिसायचा. आता गुलालाची उधळण कमी पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चांगल्या प्रतीचा गुलाल ६०ते ७० रुपये
ठोक व्यापारी ललित आमेसर म्हणाले, इतवारी गुलालासाठी विदर्भाची मुख्य बाजारपेठ आहे. येथून गुलाल सर्वत्र विक्रीसाठी जातो. पण कालांतराने पर्यावरणपूरक संस्कृतीमुळे गुलालाच्या विक्रीत घसरण होऊ लागली. आता जवळपास १ कोटीपर्यंत उरली आहे. त्यामुळे निर्मातेही कमी झाले आहेत. नागपुरात गुलाल निर्मितीचे लघु उत्पादक जवळपास ३० च्या आसपास आहेत. पूर्वी ५० पेक्षा जास्त होते. विक्री कमी होऊ लागल्याने उत्पादनही कमी होऊ लागले. माल निर्मितीनंतर पूर्ण गुलाल विकला जाईल, याची शाश्वती नसल्यामुळे उत्पादकही फारच कमी निर्मिती करतात. गुलालाची निर्मिती स्टार्चपासून करण्यात येते. शिवाय चांगल्या प्रतीच्या रंगाच्या किमतीही महागल्या आहेत. त्यामुळे ठोक बाजारात गुलाल प्रती किलो ४० ते ४५ आणि उच्च प्रतीचा ५० ते ५५ रुपये भाव आहे. किरकोळमध्ये ६० ते ८० रुपयांदरम्यान भाव आहेत. गुलाल लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, निळा रंगात २५ किलोच्या थैलीत उपलब्ध आहे. सणांनुसार रंगाची निवड करून गुलालाची खरेदी करण्यात येत असल्याचे आमेसर यांनी सांगितले.
गुलालाचे उत्पादक कमी
गुलालाची निर्मिती लालगंज, शांतिनगर, नाईक तलाव, नवीन शुक्रवारी या भागात केली जाते. पूर्वीच्या तुलनेत कच्चा मालाच्या किमती आणि मजुरी वाढल्यामुळे किमती वाढल्या आहेत. उत्पादकांनी सांगितले की, कच्चा माल रोखीत खरेदी करावा लागतो. पण विकताना उधारीत द्यावा लागतो. गुलाल विक्रीचे पैसे मिळविण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते. नफाही कमी झाला आहे. भाव वाढल्यामुळे आणि पर्यावरणपूक संस्कृतीमुळे सार्वजनिक मंडळाकडून खरेदी कमी झाली आहे. याच कारणांनी अनेकांनी निर्मिती बंद केली आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. धार्मिक कार्यात गुलालाचे महत्त्व असल्याचे उत्पादकांनी सांगितले.