गणेशोत्सव नागपूरचा; २५ कोटींची होते सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:03 AM2019-08-31T11:03:31+5:302019-08-31T11:04:11+5:30

नागपुरात लहानमोठे १५०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळे असून त्यात मंडप, डेकोरेशन, रोषणाई आणि देखाव्यांच्या माध्यमातून २५ ते ३० कोटींची उलाढाल होते.

Ganeshotsav of Nagpur; There were turnover of 25 crores on decoration | गणेशोत्सव नागपूरचा; २५ कोटींची होते सजावट

गणेशोत्सव नागपूरचा; २५ कोटींची होते सजावट

googlenewsNext
ठळक मुद्देदेखावे व डेकोरेशनमध्ये परंपरा व आधुनिकतेची सांगड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवामध्ये डीजेंचा समावेश किंवा लाऊडस्पीकरवर लावली जाणारी गाणी... आतमध्ये छान देखावे, देखणी सजावट, उत्सवाचा आत्मा... उत्साह, असे अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे स्वरूप दिसते. उंच मूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी लागलेली बाप्पाच्या भाविकांची झुंबड हेच गणेशोत्सवाचे साध्य आहे. काही मंडळे मात्र आवर्जून सामाजिक जाणीव जोपासत देखावे तयार करतात. सामाजिक विषयांना अनुषंगून आरास करतात. त्यातून जाणीवनिर्मिती व्हावी, असा त्यांचा उद्देश असतो. अनेक मंडळे देशातील देवस्थानांच्या प्रतिकृती सादर करतात. नागपुरात लहानमोठे १५०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळे असून त्यात मंडप, डेकोरेशन, रोषणाई आणि देखाव्यांच्या माध्यमातून २५ ते ३० कोटींची उलाढाल होते.

मंडळांचा विविध देवस्थानची प्रतिकृती साकारण्यावर भर
श्री गणपती उत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दीपक जयस्वाल म्हणाले, ट्रस्टतर्फे तुळशीबाग, रेशीमबाग येथे २४ वर्षांपासून मुंबईच्या ‘लालबागच्या राजा’ची प्रतिकृती ‘नागपूरचा राजा’ नावाने सादर करण्यात येते. मंडळ, डेकोरेशन, रोषणाई आणि देखाव्यात दरवर्षी वेगळेपणा असतो. जयपूर येथील फुलांची दररोज वेगवेगळी आरास केली जाते. मंडपाचे डेकोरेशन फुलांनी करण्यात येते. शास्त्रशुद्ध स्थापना आणि दररोज पूजा करण्यात येते. भक्तांना पावणारा गणेश म्हणून या मंडळाची ख्याती आहे. येथील गणेशोत्सवाचे नागपुरात आगळेवेगळे स्थान आहे. इतवारी येथील श्री संती गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख संजय चिंचोळे यांनी सांगितले की, गेल्या ६२ वर्षांपासून गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येते. दरवर्षी वेगळेपणा असतो. यावर्षी मध्य प्रदेशातील मैय्यर येथील शारदादेवी मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. याकरिता अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. मंडळ, डेकोरेशन, रोषणाई आणि देखाव्यावर जास्त भर देण्यात येतो. मंडळाने यापूर्वी, शेगाव, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूरची महालक्ष्मी, तिरुपती बालाजी, तुळजाभवानी, खंडोबा मंदिर जेजुरी, सप्तश्रृंगी मंदिर नाशिक, श्रीपाद् श्री वल्लभ मंदिर पीठापुरम, योगेश्वर देवी मंदिर अंबेजोगाई, श्री महाकालेश्वर उज्जैन, स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट आदी देवस्थानच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत.
महाल येथील दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाचे यंदा १०० वे वर्ष आहे. यावर्षी पद्मनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. शतकोत्सवी वर्षांत मंडळ, डेकोरेशन आणि रोषणाई आकर्षक राहणार आहे. आ. प्रकाश गजभिये यांच्या एकता गणेशोत्सव मंडळातर्फे अंबाझरी, हिलटॉप येथे साजरा करण्यात येणाऱ्या उत्सवात सर्वाधिक उंच गणेश मूर्ती, हे वैशिष्ट्य असते. तसेच धंतोली येथील मुन्ना जयस्वाल यांच्या गणेशोत्सव मंडळातर्फे सजावट आणि रोषणाईवर जास्त भर असतो. सजावट आणि रोषणाईसाठी इंदूर येथील कारागीर येतात. तसेच भेंडे ले-आऊट येथील बाल गणेश मंडळाचा मंडप आणि डेकोरेशनवर जास्त भर असतो. या ठिकाणी इंदूर येथील रोषणाईने सजावट करण्यात येते.
मंडळांचा भव्यदिव्य देखाव्यांवर भर
भव्यदिव्य देखावे करीत असताना, मिरवणुकीमध्ये भव्यता आणण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. संजय चिंचोळी म्हणाले, मंडळांशी संबंधित तरुण पिढी जुनी परंपरा मोडू इच्छित नाही. तरुण पिढीने आधीच्या पिढ्यांचा वारसा सांभाळला आहे. घरात ज्याप्रमाणे लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात त्याचप्रमाणे या तरुण पिढीनेही गणेशोत्सव परंपरा सांभाळण्याचे अनुकरण केले आहे. मात्र, गाभ्याला धक्का लागलेला नाही.
अनेकांनी जपली सामाजिक परंपरा
ढोल-ताशे, लेझिमच्या तालावर गणपतीचे स्वागत करण्याचा ट्रेंड वाढत असला तरी यामध्ये परंपरेपेक्षा ताकदीची लढाई जास्त असल्याचे जाणवते. पथकांची आकडेवारी वाढतच जाताना दिसते. गणपतीच्या मिरवणुकीचा ट्रक आणि त्यामागे असणारा स्पीकर्सचा ट्रक हे चित्र दिवसेंदिवस गडद होत जाताना दिसत आहे. पण आजही काही गणेश मंडळे उत्सव साधेपणाने साजरा करताना दिसतात. काही मंडळे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, व्याख्यानमाला, वकृत्त्व स्पर्धा, शब्दकोडे स्पर्धा, एकांकिका अशा विविध स्पर्धा ज्या माध्यमातून परिसरातील मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल याचा विचार करत हा उत्सव साजरा केला जातो. रेशीमबाग येथील श्री गणपती उत्सव ट्रस्टने गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे, असे दीपक जयस्वाल यांनी सांगितले.
जवळपास २५ ते ३० कोटींची उलाढाल
मंडप आणि डेकोरशनची जबाबदारी सांभाळणारे सुनील शेंडे यांनी सांगितले की, गणेशोत्सवात नागपुरातील १५०० पेक्षा जास्त मंडळातर्फे मंडप, डेकोरेशन आणि रोषणाईवर २५ ते ३० कोटींचा खर्च करण्यात येतो. मोठ्यांसह लहान मंडळेही डेकोरेशन आणि रोषणाईवर खर्च करतात. अशावेळी या क्षेत्रातील व्यवसायांची तारांबळ उडते. मोठ्या मंडळाचे डेकोरेशन आणि सजावट करण्यासाठी लागणाºया वस्तूंचे पैसे आणि कारागिरीनुसार खर्च घेण्यात येतो. मोठ्या मंडळांना १० लाखांपर्यंत खर्च येतो.

Web Title: Ganeshotsav of Nagpur; There were turnover of 25 crores on decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.